Marathi News

आगामी 4 दिवसांत महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; सर्वदूर पाऊस बरसणार, हवामान विभागाने अंदाज वर्तवला!

Written by:Rohit Shinde
Published:
आगामी 4 दिवसांत राज्यातील पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे. हवामान विभागाने तसा इशारा दिला आहे. राज्यात सर्वदूर या काळात पाऊस कोसळणार आहे.
आगामी 4 दिवसांत महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; सर्वदूर पाऊस बरसणार, हवामान विभागाने अंदाज वर्तवला!

महाराष्ट्रात पावसाने काहीसा जोर पकडायला सुरूवात केली आहे. हवामान खात्याच्या माहितीप्रमाणे येत्या दोन दिवसांत पावसाचा जोर थोडा कमी होईल, पण 13 आणि 14 ऑगस्टला चांगल्या पावसाचा अंदाज आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपातील पावसाचा अंदाज तसाच आहे. शेतकऱ्यांसाठी हा पाऊस दिलासा देणारा ठरला असून पीक वाढीसाठी आवश्यक ती ओलसरता मिळत आहे. हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज सविस्तर जाणून घेऊ…

13-14 ऑगस्टला राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, 11 ऑगस्टला देखील मराठवाड्यात ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे आणि काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडू शकतात. दिवसाचा कमाल तापमान सुमारे 30 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान अंदाजे 26 अंश सेल्सिअस राहील. ढगाळ वातावरणामुळे उष्णतेपासून थोडा आराम मिळणार आहे.मराठवाड्यातील संभाजीनगर, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, जालना, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्यामुळे हवामान विभागाने लोकांना जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः शेतकऱ्यांनी पिकांचे रक्षण करण्यासाठी योग्य खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
राज्यातील काही भागात बुधवारी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होणार आहे. या आठवड्यात बुधवार 13 ऑगस्टला बंगालच्या वायव्य उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात 12 ऑगस्ट ते 14 ऑगस्टदरम्यान विदर्भ, तसेच कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 14 ऑगस्टला रत्नागिरी, सिंधुदुर्गात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो, तर मध्य महाराष्ट्रातही काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात 13 आणि 14 ऑगस्टला गडचिरोली आणि यवतमाळमध्ये ऑरेंज ॲलर्टही देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने 13 ऑगस्टला अलर्ट जारी केला आहे. आजही राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना बळ!

या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना आवश्यक तेवढा ओलावा प्राप्त झाला आहे. विशेषतः सोयाबीन, मूग, उडीद, तूर यांसारख्या पिकांच्या विकासासाठी हा पाऊस फायदेशीर ठरतो आहे. काही भागांमध्ये मागील काही दिवसांपासून पाऊस कमी पडत होता, मात्र अलीकडच्या पावसामुळे जमिनीत चांगला ओलावा साठला आहे. यामुळे पिकांची वाढ जलद गतीने होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, 12 ऑगस्टपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठवाड्यातील लोकांनी आणि शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या खबरदऱ्या पाळून पिकांचे आणि स्वतःचे रक्षण करणे आवश्यक आहे. पावसामुळे ग्रामीण भागातील पाणीटंचाईची भीती कमी झाली असून, शेती, पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा पुरवठा होण्यास मदत होईल.
Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews