Weather Update: दक्षिण भारतात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाचे वातावरण; महाराष्ट्रावर काय परिमाण होणार?

Written by:Rohit Shinde
Published:
महाराष्ट्रात पावसाने बऱ्यापैकी उघडीप दिली असली तरी सध्या दक्षिण भारतात पावसाचे वातावरण कायम आहे. त्यामुळे महाराष्ट्रात याचा नेमका काय परिणाम होणार, ते जाणून घेऊ...
Weather Update: दक्षिण भारतात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाचे वातावरण; महाराष्ट्रावर काय परिमाण होणार?

सध्या महाराष्ट्रात पावसाचा कोणताही इशारा नसला तरी दक्षिण भारतातील सायक्लोनिक सर्क्युलेशन आणखी तीव्र झाले, तर महाराष्ट्रालाही अवकाळी पावसाचा फटका बसू शकतो. काही दिवसांपूर्वीच परतीच्या पावसामुळे राज्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकरी आता पुन्हा अशा अवकाळी पावसाची पुनरावृत्ती होऊ नये अशी अपेक्षा करत आहेत. त्यामुळे हवामान विभागाने पावसाबाबत नेमका काय अंदाज वर्तवला आहे, ते सविस्तर जाणून घेऊ…

दक्षिणेकडे पावसाचे वातावरण; राज्यात कोसळणार?

दक्षिण भारतात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. पुढील सात दिवस पावसाचे वातावरण कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. महाराष्ट्रातून मान्सूनची परतीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, त्यामुळे उन्हाचा चटका आणि उकाडा वाढलेला दिसतो. पश्चिम बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात कमी दाबाचा पट्टा म्हणजेच सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं आहे. त्यामुळे तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांना अधिक धोका निर्माण झाला आहे. तसेच कर्नाटक आणि केरळच्या किनारपट्टीलगतही अशाच प्रकारचं हवामान तयार झालं आहे. परिणामी वाऱ्यांची दिशा बदलल्याने दक्षिणेकडील भागात मुसळधार पावसाचा जोर दिसू शकतो.

दक्षिणेकडील वाऱ्यांची दिशा बदलून ते महाराष्ट्राच्या दिशेने वाहू लागले, तर काही प्रमाणात पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते. पुढील 48 तास या घडामोडींवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. सध्यातरी हवामान विभागाने कोणताही पावसाचा इशारा दिलेला नाही.

मान्सून पाऊस महाराष्ट्रातून कधी निरोप घेणार?

14 सप्टेंबर रोजी नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास राजस्थानमधून सुरू झाला. पश्चिम राजस्थानच्या काही भागातून मोसमी वाऱ्यांनी माघार घेतली. आणखी काही भागांमधून मोसमी वाऱ्यांनी परतीचा प्रवास सुरू केला. यावेळी महाराष्ट्रातून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस माघारी फिरेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानंतर बंगालच्या उपसागरात लागोपाठ निर्माण झालेले कमी दाब क्षेत्र, तसेच शक्ती चक्रीवादळ यामुळे मोसमी पावसाचा परतीचा पाऊस लांबला. साधारण 10 ते 12 दिवसांपासून पावसाचा परतीचा प्रवास खोळंबला. मात्र पुढील एक ते दोन दिवसांत राज्यातून मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास सुरू हण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे 12 ऑक्टोबरपर्यंत राज्यात पाऊस पूर्ण उघडीप देईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews