आज रक्षाबंधनानिमित्तानं देशभरात भावा-बहिणींनी आनंदात दिवस घालवला. बहिणीने भावाला राखी बांधताना त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना केली. भावानेही बहिणीच्या रक्षणाचं आणि कायम तिच्या पाठीशी उभं राहण्याचं वचन दिलं. मात्र नाशिकमधील ही रक्षाबंधन दु:खाचा डोंगर आणि कधीही न बरी होणारी जखम घेऊन आली.
नाशिकमधील वडणेर दुमाला गावातील एका चिमुरडीनं तिचा 3 वर्षांचा भाऊ गमावलाय. त्याच्या मृतदेहाच्या थंड पडलेल्या हातावर तिला राखी बांधावी लागली. भावाचं औक्षण करतेय. मनात काय विचार करतेय, हे तिचं तिलाच ठावूक. सगळेच हतबल आहेत. रडतायत. या दुःखाचं ओझं इतकं आहे, की त्या ओझ्याखाली माणूस म्हणून सगळेच पार दबले गेलेत. कुणाच्याही डोळ्याच्या कडा पाणावतील अशीच ही कहाणी. ही चिमुरडी आपल्या भावाला शेवटची राखी बांधली.
डोळ्यात अश्रू आणणारं अखेरचं रक्षाबंधन
आज रक्षाबंधनासाठी देशभरात आनंदोत्सव साजरा केला जात असताना नाशिकच्या भगत कुटुंबात तीन वर्षांच्या भावाच्या अंत्यसंस्कारासाठी धावाधाव सुरू होती. वडणेर दुमाला गावात शुक्रवारी रात्री 3 वर्षांच्या आयुषवर बिबट्याने झडप घातली. आयुष आपल्या घरासमोर खेळत असताना तो बिबट्याच्या तावडीत सापडला. काही वेळातच चिमकुल्या आयुषचा मृतदेह घराच्या जवळ हाती लागला. त्याच्या बहिणीनं रक्षाबंधनाचा आनंदाचा सण साजरा करण्याची स्वप्नं पाहिली असणार. आदल्या दिवशी तिने राखीही घेऊन ठेवली होती. मात्र अवघ्या एका रात्रीत भाऊ आपल्यामधून कायमचा जाईल असा विचारही तिने कधी केला नव्हता. भावाला शेवटचं ओवाळावं अशी इच्छा तिनं व्यक्त केली. भावाला शेवटची राखी बांधण्याची तिची इच्छा होती. चिमुकलीने आपल्या मृत भावाच्या थंड हातावर राखी बांधली आणि सगळ्यांनाच रडू कोसळलं.
गावात बिबट्याची दहशत…
नरभक्षक बिबट्या गेल्या अनेक आठवड्यांपासून या भागातल्या सीसीटीव्हींमध्ये दिसतोय. वारंवार माहिती देऊन सुद्धा त्याचा बंदोबस्त होत नाहीये. वन विभागाने शोध सुरू केलाय आणि नागरिकांना सावधानता बाळगण्याचं आवाहन केलंय. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत 10हून अधिक जणांचा बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेला आहे. कुणाचा भाऊ तर कुणाची बहीण… असं अनेकांनी आपल्या जवळचं कुणीतरी गमावलंय. जी वेळ रक्षाबंधनाच्या दिवशी या चिमुकलीवर आली, ती तर माणूस म्हणून कुणाच्याही काळजावर खोल जखम करणारीच होती. किमान यानंतर तरी वनविभाग गांभीर्याने या नरभक्षक बिबट्याच्या दहशतीतून गावकऱ्यांची मुक्तता करण्यासाठी प्रयत्न सुरु करेल, अशी अपेक्षा आहे.






