पुण्यातील खड्ड्यांच्या तक्रारी करा ॲपवर; महापालिकेने जारी केले ‘पीएमसी रोड मित्र’ॲप

Written by:Rohit Shinde
Published:
खड्ड्यांची माहिती थेट महापालिकेपर्यंत पोहोचवण्यासाठी पुणे महापालिकेने 'पीएमसी रोड मित्र' नावाचे मोबाईल ॲप तयार केले आहे.
पुण्यातील खड्ड्यांच्या तक्रारी करा ॲपवर; महापालिकेने जारी केले ‘पीएमसी रोड मित्र’ॲप

पावसाळ्यात शहरांतील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न विशेष चर्चेत येतो. नागरिकांना या खड्ड्यातून वाढ काढत प्रवास करावा लागतो. काही वेळा अपघातात वाहनांचे नुकसान होते तर काहीवेळा नागरिकांना जीव देखील गमावावा लागतो. अशा परिस्थिती पुणे महापालिकेने एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पुणे शहरातील रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांची माहिती थेट महापालिकेपर्यंत पोहोचवण्यासाठी पुणे महापालिकेने ‘पीएमसी रोड मित्र’ नावाचे मोबाईल ॲप तयार केले आहे.

खड्ड्यांची तक्रार करण्यासाठी उपाययोजना

नागरिकांना पीएमसी रोड मित्र या ॲपच्या माध्यमातून रस्त्यांवरील खड्ड्यांचे फोटो आणि व्हिडिओ पाठवता येणार असून महापालिका प्रशासन त्यावर तात्काळ कारवाई करणार आहे. खड्ड्यांची संख्या आणि अपूर्ण दुरुस्तीमुळे वाहनचालकांचे हाल होत आहेत. अनेक वेळा महापालिकेच्या पथ विभागाकडे तक्रार करूनही प्रतिसाद मिळत नाही. अशा तक्रारींना आळा बसावा म्हणून हे ॲप तयार करण्यात आले आहे.’पीएमसी रोड मित्र’ या ॲपद्वारे नागरिक दोन-तीन फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करू शकतात.  यामुळे खड्ड्यांची वेगाने दुरूस्ती करणे शक्य होणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे.

कसे वापरायचे महापालिकेचे ॲप?

फोटोमध्ये जीपीएस स्थान (अक्षांश-रेखांश) समाविष्ट असल्‍यामुळे खड्ड्याचे ठिकाण अचूकपणे ओळखले जाईल. ही माहिती महापालिकेच्या संबंधित विभागाकडे आपोआप पाठवली जाईल. नोंद झाल्यावर कनिष्ठ अभियंता त्या जागी जाऊन खड्डा बुजवेल व केलेल्या कामाचे फोटो पुन्हा त्या तक्रारीस जोडेल. यामुळे तक्रारदारास पूर्वी आणि नंतरची स्थिती स्पष्टपणे दिसून येईल.

ॲपच्या वापरामुळे विभाग प्रमुखांना संपूर्ण शहरातील तक्रारी, त्यावर झालेली कारवाई, कोणत्या अधिकाऱ्यांनी जबाबदारी घेतली किंवा दुर्लक्ष केले याचा तपशीलवार आढावा घेता येणार आहे.सध्या हे ॲप अँड्रॉइड फोनसाठी प्ले स्टोअरवर उपलब्ध होणार आहे. पुणेकरांना यामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारीसाठी विशेष उपाय मिळाला आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews