Marathi News

कोकणाचा जलदगतीने विकास करण्यासाठी रस्ते, महामार्ग उभारणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही

Written by:Astha Sutar
Published:
राज्य शासनामार्फत महिला सक्षमकरणासाठी सुरु करण्यात आलेली लाडकी बहीण योजना किती ही अडचणी आल्या तरी बंद करण्यात येणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.

Eknath Shinde – कोकणातील विकासाला गती देण्यासाठी येथील प्रवासाचा कालावधी कमी करण्याची गरज आहॆ. यासाठी राज्य शासनाने कोस्टल महामार्गावरील ९ खाडी पुलांचे काम सुरू केले आहे. तसेच मुंबई-गोवा महामार्गाचे  काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध कोकणाचा जलदगतीने विकास व्हावा यासाठी रस्ते व महामार्ग उभारून प्रवासाचा वेग कमी करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

लोकांभिमुख प्रकल्प राबवून विकासाला चालना

मुंबई ते सिंधुदुर्ग ऍक्सेस कंट्रोल रस्ता उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. मुंबई गोवा महामार्ग वर माणगाव येथे होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी माणगाव बायपासचे काम लवकरच मार्गी लावण्यात येईल. कोकणातील लोकांना स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मोठे प्रकल्प या ठिकाणी उभारण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रवासाचा वेग कमी करण्याची गरज लक्षात घेऊन मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करणे, मुंबई सिंधुदुर्ग अॅक्सेस कंट्रोल रस्ता बरोबरच अनेक रस्त्यांची उभारणी करण्यात येणार आहे. तसेच राज्य शासन अनेक लोकांभिमुख प्रकल्प राबवून विकासाला चालना देत असल्याचेही शिंदे म्हणाले.

माणगावात विविध शैक्षणिक दालने सुरू

दरम्यान, मराठीचा सन्मान राखायलाच हवा, मात्र जागतिक स्पर्धेला तोंड द्यायचे तर इंग्रजी देखील यायला हवे, त्याच दृष्टिकोनातून पालकांची मागणी पूर्ण करण्यासाठी माणगाव शिक्षण प्रसारक मंडळामार्फत ही सीबीएसई शाळा सुरू करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. भविष्यात या शाळेतून अनेक उत्तमोत्तम विद्यार्थी घडावेत अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या. खा. सुनील तटकरे यांनी संस्थेने माणगावात विविध शैक्षणिक दालने सुरू करून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे सर्व सामान्य आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना माणगावातच उच्च शिक्षण घेता येत आहे.
Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews