पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात ससूनचा अहवाल समोर; प्रांजल खेवलकरांच्या रिपोर्टचे काय झाले?

Written by:Rohit Shinde
Published:
प्रांजल खेवलकर आणि श्रीपाद यादव यांनी मद्यप्राशन केल्याचे ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालातून समोर आले आहे.
पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात ससूनचा अहवाल समोर; प्रांजल खेवलकरांच्या रिपोर्टचे काय झाले?

पुण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापेमारी केली आहे. पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागात रेव्ह पार्टी सुरू होती. विशेष म्हणजे या रेव्ह पार्टीतून एकनाथ खडसेंचा जावई आणि रोहिणी खडसेंचा पती प्रांजल खेवलकरला अटक करण्यात आली आहे.  पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ, दारू, हुक्का घेत असल्याचं उघडकीस आलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून अटकेत असलेल्यांना पुण्यातील ससून रूग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. शिवाय या प्रकरणात आता ससून रूग्णालयाचा प्राथमिक तपासणी अहवाल समोर आला आहे.

अहवालात नेमके काय निष्कर्ष?

ससून रूग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असता‌ सातपैकी दोघांनी मद्यपान केल्याचा प्राथमिक अहवाह पोलिसांनी दिला असल्याची सूत्रांची माहिती आहे. यामध्ये प्रांजल खेवलकर आणि श्रीपाद यादव यांनी मद्यप्राशन केल्याचे ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालातून समोर आले आहे. मात्र सात जणांपैकी कोणी अंमली पदार्थांच सेवन केलं होतं का? हे मात्र न्यायवैद्यकिय प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आलेल्या आरोपींच्या नमुण्यांच्या तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे.

अंमली पदार्थांचा वापर झाला का?

खाजगी जागेमध्ये मद्यपान करणे हा गुन्हा ठरत नाही. मात्र त्या पार्टीत अंमली पदार्थ सापडल्याचा दावा पुणे पोलीसांनी केला आहे. त्यामुळे प्रांजल खेवलकरांच्या अडचणी वाढणार की दिलासा मिळणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, अंमली पदार्थांच सेवनाच्या अहवालातून नेमकं काय समोर येईल, याबाबत येत्या 48 तासांत स्पष्ट होईल.

खेवलकरांना अडकवण्याचा प्रयत्न?

दरम्यान सातही आरोपींना काल न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी विजयसिंह ठोंबरे यांनी प्रांजल खेवलकरांची बाजू मांडली. प्रांजल खेवलकर यांनी कोणत्याही अंमली पदार्थाचे सेवन केलेलं नाही. मेडीकल रिपोर्ट येतील तेव्हा लक्षात येईल कोणत्याही अंमली पदार्थाचे सेवन केलंलं नव्हतं. प्रांजल खेवलकर राहत असलेल्या हॉटेलची रेकी करण्यात आली होती. त्यामुळे हा प्रांजल खेवलकरांना अडकविण्यासाठी षडयंत्र रचण्यात आल्याचा दावा वकीलांकडून केला जात आहे. आता यामध्ये नेमके काय सत्य समोर येते ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews