मुंबई – मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील सातही तलावांमध्ये सध्या 25 टक्के जलसाठा जमा झाला आहे. हे पाणी पुढील 95 दिवसांसाठी म्हणजेच सप्टेंबरपर्यंत पुरणारे आहे. त्यामुळे मुंबईवरील पाणीकपातीचे संकट टळले आहे.
मुंबईला मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून दररोज 3 हजार 850 दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो.
मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणांत 1 ऑक्टोबर रोजी 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाणी जमा होणे गरजेचे असते.
सुरुवातीला पाठ नंतर मात्र सुसाट
या साठयानुसार मुंबईच्या वर्षभराच्या पाणीपुरवठय़ाचे नियोजन केले जाते. त्यामुळे जूनपासून तलाव क्षेत्रात जोरदार पाऊस होणे गरजेचे असते. मात्र या वर्षी मेअखेर सुरू झालेल्या पावसाने सुरुवातीचा काही काळ धरण क्षेत्राकडे पाठ फिरवल्याने जलसाठा 10 टक्क्यांपर्यंत खाली आला होता. त्यामुळे मुंबईवर पाणी कपातीचे संकट आले होते. मात्र जूनमध्ये गेल्या दोन आठवडयात बरसलेल्या मान्सूनने कसर भरून काढत जोरदार बरसल्याने जलसाठा 25 टक्के जमा झाला आहे.
पवासाचा जोर कायम राहणार
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्यामुळे मुंबईचे पाणी संकट टळले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार
गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यालाही दिलासा मिळाला आहे. नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याच्या पाहायला मिळतंय. कृष्णा नदीला वाढलेल्या पाण्यामुळे नृसिंहवाडीतील दत्त मंदिरासमोर दक्षिणद्वार सोहळा होण्याची शक्यता निर्माण झालीय.
जूनमध्येच दक्षिणद्वार सोहळ्याची संधी
कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ सुरू असल्याने आज शनिवारी नृसिंहवाडी येथील प्रसिद्ध श्री दत्त मंदिरासमोर नदीचे पाणी पोहोचले आहे. दरवर्षी जुलै महिन्याच्या सुरुवातीस या परिसरात पाणी येण्याची शक्यता असते. मात्र, यंदा पावसाने जून महिन्याच्या निम्म्यातच दमदार हजेरी लावल्याने पाणी मंदिरासमोरील पोहोचले आहे. गेल्या २४ तासात कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत तीन फूट वाढ झाली आहे. परिणामी,नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिर परिसरात पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, दत्त देवस्थान समितीमार्फत मंदिर परिसरातील साहित्य सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पावसाचा जोर आणि धरणांमधील विसर्ग असाच सुरू राहिल्यास, लवकरच मंदिरात यंदाचा पहिला ‘दक्षिणद्वार सोहळा’ पार पडण्याची शक्यता स्थानिक पुजाऱ्यांनी व्यक्त केली आहे.





