State School : बदलापूर येथील एका खासगी शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचारांच्या घटनेनंतर राज्यातील शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, सुरक्षा रक्षक, सफाई कामगार, स्कूल बसचे चालक आदींची चारित्र्य पडताळणी करणे, तक्रार पेटी बसवणे आदी सुरक्षेच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यात १ लाख १२ हजार ३५१ शाळा असून शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात काय उपाययोजना केल्या त्याचा अहवाल १ ऑगस्टपर्यंत सादर करा, असे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नियमावली जारी…
शाळा व्यवस्थापनाकडून प्राप्त अहवाल ५ ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. बदलापूर येथील एका खासगी शाळेत दोन चिमुरड्यांवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर राज्यातील शाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. अखेर शालेय शिक्षण विभागाने राज्यातील शाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नियमावली जारी केली.
अहवाल १ ऑगस्टपर्यंत सादर करावा
प्रत्येक शाळांत व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, सफाई कामगार, मदतनीस, स्कूल-बसचे चालक आदी संबंधित व्यक्तीच्या पार्श्वभूमीची काटेकोर तपासणी शाळा व्यवस्थापनामार्फत करणे, विशेष करुन मुलींसाठी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे असे आदेश शालेय शिक्षण विभागाने ऑगस्ट २०२४ मध्ये दिले होते. त्यानंतर प्रत्यक्षात शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात काय उपाययोजना केल्या याचा अहवाल शालेय शिक्षण विभागाने १ ऑगस्टपर्यंत सादर करावा, असे आदेश शालेय शिक्षण विभागाने शाळा व्यवस्थापनास दिले.
शाळा व विद्यार्थी संख्या
राज्यात एकूण १,१२ ३५१ शाळा
६७,९४२ या सरकारी
४४,४०९ खाजगी शाळा
एकूण विद्यार्थी संख्या २,११,७४,००१
मुलींची संख्या १११०६७५८
मुलांची संख्या १००६७२४३





