Shivsena – शिवसेनेच्या गोटातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. शिवसेना पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्ते पदी शायना एन.सी यांची नियुक्ती करण्यात आल्याचे शिवसेना पक्ष सचिव संजय मोरे यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे म्हटले आहे. त्यामुळं राष्ट्रीय पातळीवर शिवसेनी भूमिका मांडण्याची जबाबदारी शायना एन. सी यांना देण्यात आली आहे. ही नियुक्ती शिवसेना प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे.
प्रसिद्धी पत्रकात काय म्हटलंय?
मागील दोन दशकांहून अधिक काळ मुंबई आणि राष्ट्रीय राजकारणात शायना एन.सी सक्रीय आहेत. विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये शायना एन.सी यांनी त्यांनी शिवसेनेकडून दक्षिण मुंबईतील मुंबादेवी मतदार संघातून निवडणूक लढली होती. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने शायना एन.सी यांना राष्ट्रीय प्रवक्ते पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ही नियुक्ती एक वर्षासाठी असेल असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
बाळासाहेबांचा हिंदुत्ववादी विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा सक्रियपणे प्रचार आणि प्रसार करून सर्वांना सोबत घेऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावेत असे पक्षाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
कोण आहेत शायना एन. सी?
फॅशन डिझायनरमधून राजकारणी बनलेल्या शायना एनसी यांना एक वर्षासाठी या नवीन पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. शायना एनसी शिवसेनेपूर्वी भारतीय जनता पक्षात होत्या, त्या २०२४ मध्ये भाजपमध्ये सामील झाल्या. शायना एनसी जवळपास २० वर्षे भाजपमध्ये होत्या, ज्यांनी २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप सोडला आणि त्यांचा मित्रपक्ष शिवसेनेशी हातमिळवणी केली. ज्यामध्ये सत्ताधारी महायुती आघाडीने महाराष्ट्रात प्रचंड बहुमताने सत्ता कायम ठेवली. शायना एनसीने २०२४ ची विधानसभा निवडणूक मुंबादेवी मतदारसंघातून लढवल्या होत्या मात्र त्यांना पराभव पत्कारावा लागला.





