Marathi News

अतिवृष्टी, पुरामुळे मराठवाड्यात नुकसान; ठाकरेंच्या शिवसेनेचा संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चा!

Written by:Rohit Shinde
Published:
मराठवाड्यात पुरामुळे यंदा अतोनात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर आता ठाकरेंच्या शिवसेनेने आता आक्रमक भूमिका घेतली असून आज संभाजीनगरात हंबरडा मोर्चा काढण्यात येत आहे.
अतिवृष्टी, पुरामुळे मराठवाड्यात नुकसान; ठाकरेंच्या शिवसेनेचा संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चा!

अतिवृष्टी आणि शेतीच्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आंदोलन पुकारले आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात गावागावांमध्ये ग्रामसभा घेतल्या जात होत्या. ११ ऑक्टोबर रोजी म्हणजेच आज छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त कार्यालयावर हंबरडा मोर्चा काढण्यात येत आहे. उद्धव ठाकरे या मोर्चाचे नेतृत्व करतील. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न आहे. यावेळी मराठवाड्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांची मोठी गर्दी होताना दिसत आहे.

ठाकरेंच्या नेतृत्वात हंबरडा मोर्चा

संभाजीनगरमध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्या नेतृत्वात ‘हंबर्डा मोर्चा’ काढण्यात येत आहे. ‘या मोर्चाच्या माध्यमातून सरकारचा समाचार घेणार,’ असा स्पष्ट इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. या मोर्चाद्वारे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत आणि सरसकट कर्जमाफीची मागणी लावून धरण्यात आली आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे नेते संभाजीनगर विमानतळावर दाखल झाले असून, क्रांती चौकातून मोर्चाला सुरुवात होणार आहे. उद्धव ठाकरे स्वतः सुमारे दोन किलोमीटर पायी चालणार असल्याची माहिती पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी दिली. मराठवाड्यातील शेतकरी आणि कार्यकर्ते या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

मराठवाड्यात पावसामुळे नुकसान

यंदा मराठवाडा विभागात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. अनेक ठिकाणी पिके पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने सोयाबीन, कापूस, तूर, मूग यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतजमिनीवर गाळ साचल्यामुळे पुढील पिकांची पेरणी करणे कठीण झाले आहे. काही भागात घरांचे आणि जनावरांचेही नुकसान झाल्याची माहिती आहे. शासनाकडून पंचनामे सुरू असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. हवामानातील अनिश्चिततेमुळे शेतीवर मोठा परिणाम होत असून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसह दीर्घकालीन नियोजनाची गरज भासत आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews