Marathi News

नकली आखाड्यातून आज खऱ्या आखाड्यात आलात, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उबाठावर खरमरीत टीका

Written by:Astha Sutar
Last Updated:
सीमेवरील जवानांसाठी दिल्लीत रक्तदान शिबीर घेण्याचा संकल्प चंद्रहार पाटील यांनी केलाय. त्यांची देशभक्ती पाहता दिल्लीत काय काश्मीरमध्ये रक्तदान शिबीर घेऊ, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
नकली आखाड्यातून आज खऱ्या आखाड्यात आलात, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उबाठावर खरमरीत टीका

Eknath Shinde – सांगली जिल्ह्यातील उबाठाचे पदाधिकारी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. तीन वर्षांपूर्वी उठाव झाल्यानंतर आपल्यावर दररोज आरोप झाले, पण मुख्यमंत्री असताना आरोपाने नाही तर कामातून उत्तर दिले. त्यामुळेच महाराष्ट्रातील जनतेने या कामांना ऐतिहासिक प्रतिसाद दिला आणि महायुतीच्या २३२ जागा निवडून आल्या. ही शिवसेना हिंदुह्रदयसम्राटांची शिवसेना आहे टोमणेसम्राटांची नाही, अशी खरमरीत टीका शिवसेनेचे मुख्य नेतेउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केली.

नकली आखाड्यातून आज खऱ्या आखाड्यात

दरम्यान, मी जरी पैलवान नसलो तरी २०२२ मध्ये समोरच्या लोकांना चारीमुंड्या चीत केले. तेव्हा असे डावपेच टाकले की ते अद्याप उठले नाहीत. पैलवानांना डावपेच माहित असतात. कुस्तीला बळ देण्यासाठी त्याला राजकीय पाठिंबा आवश्यक आहे. चंद्रहार पाटील यांचा आखाडा मंत्री उदय सामंत यांनी बघितला आहे. नकली आखाड्यातून आज खऱ्या आखाड्यात आलात. पैलवान पाटील हे कुटील माणसाकडून स्वच्छ मनाच्या माणसाकडे आले आहेत. चंद्रहार पाटील यांनी मराठी मातीचा खेळ असलेल्या कुस्तीला लौकिक मिळवून दिला. पैलवान हे महाराष्ट्राचे वैभव आहे. चंद्रहार पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिंदे बोलत होते.

अहंकारामुळे सहकाऱ्यांना घरगडी समजायचे

मी देखील शेतकऱ्याचा मुलगा शाखाप्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री झालो. पण अजूनही काहीजणांना पचनी प़डत नाही. त्यांची पोटदुखी दूर करण्यासाठी राज्यात हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु केलाय. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, इथं कोणी मालक नाही. बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे मात्र त्यांच्यानंतर काही लोक अहंकारामुळे सहकाऱ्यांना घरगडी समजू लागले. अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठावर केली. महाराष्ट्रातील प्रत्येक तालीम आपल्याला जोडायची आहे, असे ते म्हणाले.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews