राज्याच्या बहुतांश भागात पावसात खंड पडण्याची चिन्हे; हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Written by:Rohit Shinde
Published:
राज्यातील पावसामध्ये खंड पडण्याची चिन्हे सध्या निर्माण झाली आहेत. हवामान विभागाने पुढील काही दिवसांमध्ये पावसाचा जोर ओसरेल, असा अंदाज वर्तवला आहे.
राज्याच्या बहुतांश भागात पावसात खंड पडण्याची चिन्हे; हवामान विभागाने वर्तवला अंदाज

पुढील काही दिवसांसाठी राज्यातील पावसाचा जोर ओसरण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. काही दिवस पावसात खंड पडू शकतो. गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या बहुतांश भागात आकाश ढगांनी आच्छादलेले आहे. पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊसही पडताना दिसत आहे. मात्र, आगामी काही दिवसांत पावसामधून थोडा विसावा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान विभागाने नेमका काय अंदाज वर्तवला, ते जाणून घेऊ…

विदर्भ-मराठवाड्यात पावसाची काय स्थिती?

विदर्भाच्या पूर्व भागातील काही जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता आहे. नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाला ब्रेक लागलेला दिसत आहे. एकूणच गेल्या आठवड्यात राज्यभर जोरदार पावसाचा अनुभव आला, मात्र आता पूर्व विदर्भातील काही भाग सोडले तर राज्यातील बहुतांश भागांत पावसाची कमी झालेली स्पष्टपणे जाणवत आहे. मराठवाड्यातही पावसाची जोरदार हजेरी सध्या कमी झाली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये आकाश मुख्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. स्थानिक हवामानाच्या बदलामुळे काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडू शकतात.

उत्तर-पश्चिम महाराष्ट्रात पावसात खंड?

उत्तर महाराष्ट्रात सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये आकाश प्रामुख्याने ढगाळ राहण्याची शक्यता असून, काही निवडक भागांत हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. तिकडे पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत घाटमाथ्याचा भाग वगळता उर्वरीत भागात पावसाने पुर्णपणे विश्रांती दिली आहे. त्यामुळे सातारा, सांगली, कोल्हापुर आणि सोलापूरच्या मैदानी भागात पाऊस हलका ते तुरळक सरी असा असण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

मुंबई, पुण्यात पाऊस ओसरण्याची चिन्हे

मुंबई शहर तसेच उपनगरांमध्ये आकाश मुख्यतः ढगांनी वेढलेले राहण्याची शक्यता आहे. यासोबतच मधूनमधून हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही ढगाळ हवामानासोबतच हलकासा पाऊस पडू शकतो. पुणे शहरात आकाश ढगांनी आच्छादलेले राहण्याची शक्यता असून, हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुण्यासोबतच सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्येही पावसामध्ये काही प्रमाणात खंड पाहायला मिळू शकतो. त्यामुळे आगामी काही दिवसांत मुंबई, पुणेकरांना सततच्या पावसापासून दिलासा मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews