सोलापूरहून मुंबई आणि गोव्याला हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच या दोन्ही महत्त्वाच्या मार्गांवर दररोज विमानसेवा सुरू होणार आहे. सोलापूर शहराचे वाढते औद्योगिक आणि व्यापारी महत्व लक्षात घेत सुरू करण्यात आलेल्या विमानसेवेचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीत आता मोठा निर्णय खरंतर घेण्यात आला आहे.
सोलापुरातून मुंबई आणि गोव्यासाठी रोज विमानसेवा
स्टार एअरलाईन्सने सोलापूर-मुंबई मार्गावरील सध्याची चार दिवसांची सेवा 1 नोव्हेंबरपासून सातही दिवस सुरू ककरण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता सोलापूर-मुंबई विमान प्रवास दररोज उपलब्ध असणार आहे. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन ‘फ्लाय 91’ कंपनीनेही सोलापूर-गोवा मार्गावर दररोज विमानसेवा सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे सोलापूरकरांना आता गोव्यासाठी देखील दररोज विमानसेवा उपलब्ध होणार आहे. निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सोलापुरातून रोज मुंबईसाठी स्टार एअरलाईन्सचे विमान
सोलापूर-मुंबई विमानसेवा 15 ऑक्टोबर रोजी सुरू झाली. सुरुवातीला आठवड्यातून फक्त चार दिवस उड्डाणे होती. परंतु आता मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्लॉट मिळाल्यामुळे 1 नोव्हेंबरपासून स्टार एअरलाईन्सकडून ही सेवा आठवड्यातील सातही दिवस सुरू करण्यात येणार आहे. सध्या ही विमानसेवा मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी सुरू आहे. ही मागणी पूर्ण झाल्याने व्यावसायिक प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गोव्यासाठी फ्लाय 91 कंपनीचे दररोज विमान ?
सोलापूर-गोवा (मोपा) मार्गावर विमान प्रवासाला प्रवाशांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. या वाढत्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर ‘फ्लाय 91’ कंपनीनेही ही सेवा दररोज सुरू करण्याची तयारी चालवली आहे. सध्या कंपनीकडे तीन एअरक्राफ्ट असून कंपनीच्या ताफ्यात चौथे विमान दाखल होताच ही सेवा सुरू होईल. कंपनीच्या अधिकाऱ्यांमनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून गोव्यासाठी रोज विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे.
सोलापूर विमानतळाचे वाढते महत्व आणि प्रतिसाद
सोलापूर विमानतळाचे महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. औद्योगिक, शैक्षणिक आणि व्यापारी दृष्ट्या सोलापूरचे स्थान महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये गणले जाते. त्यामुळे विमान वाहतुकीची गरज मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्रवासी तसेच व्यावसायिक वर्गाकडून या विमानतळाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. पुणे, मुंबई, नागपूर यांसारख्या शहरांशी हवाई संपर्क वाढल्याने स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. पर्यटन आणि गुंतवणुकीच्या संधीही वाढल्या आहेत. शासनाने विमानतळाच्या विस्तारासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे भविष्यात हे केंद्र दक्षिण महाराष्ट्रासाठी एक महत्त्वपूर्ण हवाई वाहतूक केंद्र ठरणार आहे.






