सोलापूर ते गोवा विमान प्रवास ही एक वेगळी आणि सोयीची यात्रा आहे. हा प्रवास सुमारे १ ते २ तासांचा असून पर्यटनासाठी, व्यवसायासाठी किंवा विश्रांतीसाठी उपयुक्त आहे. सोलापूर येथून गोवा गाठण्यासाठी विमान प्रवासामुळे वेळ वाचतो आणि प्रवास अधिक आरामदायक होतो. आता सोलापूर-गोवा विमानसेवेचे दर आणखी कमी होणार आहेत. यामुळे प्रवाशांना आणखी दिलासा मिळणार आहे. शिवाय प्रवाशांची पसंती वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
फ्लाय 91 ची मान्सून ऑफर
सोलापूरकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता सोलापूर-गोवा विमान प्रवास आणखी स्वस्त आणि परवडणारा झाला आहे. फ्लाय 91 (Fly91) या विमान कंपनीने प्रवाशांसाठी खास मॉन्सून ऑफर जाहीर केली आहे. यामुळे सोलापूर-गोवा विमान तिकीटांचे दर आणखी कमी झाले आहेत. फ्लाय 91 ने आपल्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी ही विशेष मॉन्सून ऑफर आणली आहे. या ऑफरनुसार 31 जुलैपर्यंत तिकीट बुकिंग केल्यास आणि 31 ऑगस्टपर्यंत प्रवास केल्यास तुम्हाला 200 ते 500 रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. यामुळे सोलापूरहून गोव्याला जाण्यासाठी आता कमी पैसे खर्च करावे लागणार आहेत. या ऑफरमुळे गोव्याला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या प्रवासाचे बजेट कमी होणार आहे.
ट्रिपचा प्लॅन करा, लाभ घ्या
9 जूनपासून गोवा-सोलापूर मार्गावर विमानसेवा सुरू केली होती. या कमी कालावधीतच या मार्गाला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत या मार्गावरून तब्बल 1 हजार 414 प्रवाशांनी हवाई प्रवास केला आहे. यावरून ही विमान सेवा किती यशस्वी झाली याचा संकेत मिळतो. केवळ सोलापूर-गोवा मार्गासाठीच नाही तर फ्लाय 91 च्या सर्वच मार्गांवर ही मॉन्सून ऑफर लागू असल्याची माहिती फ्लाय 91चे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक आशुतोष चिटणीसांनी दिली.
सोलापूर येथून गोवा गाठण्यासाठी विमान प्रवासामुळे वेळ वाचतो आणि प्रवास अधिक आरामदायक होतो. गोवा हे प्रसिद्ध समुद्रकिनारे, रिसॉर्ट्स आणि निसर्गसौंदर्य यांसाठी ओळखले जाते. त्यामुळे सोलापूरहून गोवा जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा मार्ग अधिक आकर्षक ठरतो. काही खासगी विमान कंपन्या या मार्गावर सेवा देतात, मात्र नियमित सेवा आणि वेळा तपासूनच तिकीट बुक करावे. सणासुदीच्या काळात प्रवासासाठी आगाऊ नियोजन करणे फायदेशीर ठरते.






