ईद ए मिलाद हा इस्लाम धर्मातील अत्यंत पवित्र आणि आनंदाचा सण मानला जातो. हा दिवस प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो. या दिवशी मुस्लिम बांधव एकत्र येऊन मशिदींमध्ये प्रार्थना करतात, कुरआन पठण करतात आणि धर्मोपदेश ऐकतात. समाजात एकोपा, शांती आणि बंधुत्वाचा संदेश दिला जातो. घरोघरी विशेष खाद्यपदार्थ तयार केले जातात आणि गरजू लोकांना मदत केली जाते. सजावट, मशिदींची रोषणाई आणि मिरवणुका या सणाची शोभा वाढवतात. मुस्लिम बांधवांत उत्साह आणि भक्तिभाव दिसून येतो. हा सण धार्मिक श्रद्धा, सामाजिक ऐक्य आणि मानवी मूल्यांची जाणीव करून देणारा आहे. खरंतर या सणाचा मुंबईत मोठा उत्साह पाहायला मिळतो. अनेक ठिकाणी गर्दी होते…या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत काही बदल करण्यात आले आहेत.
मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत बदल
येत्या 8 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईत ईद-ए-मिलादच्या मिरवणुका निघणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी पूर्व उपनगरात वाहतूक मार्गात काही बदल केले आहेत. मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेने अधिसूचना काढली आहे. त्यानुसार, मानखुर्द आणि घाटकोपर भागात मिरवणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. शेकडो गाड्या टू व्हीलर्स आणि ट्रक या मिरवणुकी असतील असा अंदाज आहे. 8 सप्टेंबर रोजी मोठ्या मिरवणूकांमुळे घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होण्याची शक्यता असल्याच अधिसूचनेत म्हटलं आहे.
अवजड वाहनांसाठी (ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीतील वाहन आणि बेस्ट बसेस वगळून) छेडा नगर जंक्शन ते मानखुर्द टी जंक्शन मार्ग बंद असेल. हलक्या वाहनांसाठी घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडचा उड्डाण पुल वापरणं बंधनकारक असेल. घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर (छेडा नगर जंक्शन ते मानखुर्द टी जंक्शन) वर वाहनांच्या पार्किंगला बंदी आहे.
छेडा नगरहून वाशिला जाणाऱ्या वाहनांनी ईस्टन एक्सप्रेस हायवेचा उमरशी बाप्पा जंक्शन आणि व्ही.एन.पुरव मार्गाचा वापर करावा. मानखुर्द टी जंक्शन ते घाटकोपर किंवा विक्रोळीवरुन येणाऱ्या वाहनांनी उमरशी बाप्पा जंक्शन आणि व्ही.एन.पुरव मार्गाचा वापर करावा.
घाटकोपर पश्चिम चिराग नगर लेन जामा मशीद येथून दुपारी 1 वाजता ईद-ए-मिलादची स्वतंत्र मिरवणूक निघेल. विक्रोळी पार्कसाइट येथे ही मिरवणूक संपेल. 25 हजार लोक आणि 100 वाहन या मिरवणुकीत असतील असं अधिसूचनेत म्हटलं आहे.
पवई गांधी नगर जंक्शनवरुन दक्षिण मुंबईत जाणारी वाहनं जेव्हीएलआर, विक्रोळी मार्गे वळवण्यात आली आहेत. श्रेयस जंक्शन आणि सावित्री बाई फुले जंक्शन जवळील वाहनं ईस्टन एक्सप्रेस हाय वे आणि पंतनगरला वळवण्यात आली आहेत.
सुट्टीच्या तारखेत बदल; निर्णय जाहीर
शनिवार दि ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदूचा सण आहे. राज्यात बंधुता आणि हिंदू – मुस्लिम ऐक्य राखण्यासाठी मुस्लीम समुदायाने जुलूसचा कार्यक्रम ८ सप्टेंबर २०२५ रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शुक्रवार दि. ५ सप्टेंबर रोजीची सुट्टी आता सोमवार दि. ८ सप्टेंबर रोजी देण्यात येणार आहे. मुंबई शहर व उपनगरातील शासकीय कार्यालये ५ सप्टेंबर रोजी नियमित सुरु राहतील, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रकाद्वारे दिली आहे. त्यामुळे नागरिकांना आता सार्वजनिक सुट्टीतील तारखेच्या बदलाबाबत नोंद घ्यावी लागणार आहे.






