यंदाच्या महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः सोयाबीन पिकावर या नैसर्गिक आपत्तीचा मोठा परिणाम झाला आहे. सततच्या पावसामुळे पिके पाण्याखाली गेली, मुळे कुजली आणि उत्पादन क्षमता घटली. शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने घेतलेले सोयाबीन पीक आता नष्ट झाल्याने त्यांच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत आता राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात काहीशी सुधारणा होताना दिसत आहे.
बाजारात सोयाबीनच्या दराची स्थिती
राज्याच्या मार्केटमध्ये 210 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. यापैकी चंद्रपूर मार्केटमध्ये सर्वाधिक 143 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 1400 ते 3800 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच छत्रपती संभाजीनगर मार्केटमध्ये 43 क्विंटल सोयाबीनची आवक होऊन त्यास 4100 रुपये प्रतिक्विंटल सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी
राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक चांगलीच वाढताना दिसत आहे. याचा फटका आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. कारण, दरांमध्ये घसरण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खरंतर एकीकडे राज्यामध्ये कांद्याच्या मागणीत वाढ जरी झाली असला तरी दुसरीकडे आवक देखील तेवढीच वाढत आहे. परिणाम कांद्याच्या दरामध्ये कोणतीही लक्षवेधी सुधारणा होताना दिसत नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.
बाजारात कांद्याच्या दराची स्थिती
राज्याच्या मार्केटमध्ये 57 हजार 315 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 17 हजार 991 क्विंटल सर्वाधिक आवक पुणे बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 600 ते जास्तीत जास्त 1475 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच सातारा मार्केटमध्ये आवक झालेल्या 414 क्विंटल कांद्यास प्रतीनुसार 1500 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला.






