महाराष्ट्र राज्यासाठी राष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा एक गौरवाचा क्षण आला आहे. देशातील स्वच्छ शहरांच्या यादीत यंदा महाराष्ट्राने पुन्हा एकदा आपला दबदबा कायम ठेवला आहे. स्वच्छता सर्वेक्षणात महाराष्ट्राला किंबहुना महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपरिषद दर्जाच्या 10 शहरांना पुरस्कार मिळाले आहेत. केंद्र सरकारच्या नागरी विकास मंत्रालयाच्या वतीने करण्यात आलेल्या ‘स्वच्छता सर्वेक्षण 2024-25’ मध्ये महाराष्ट्रातील विविध महापालिकांनी आणि नगरपरिषदांनी उत्तम कामगिरी केली.
स्वच्छतेचे मुल्यमापन; राज्यातील शहरांचा डंका
स्वच्छतेच्या मूल्यमापनासाठी दरवर्षी संपूर्ण देशभरातून शहरे, महापालिका आणि नगरपरिषदांचे सर्वेक्षण केले जाते. या वर्षीच्या सर्वेक्षणातील यशस्वी शहरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले.महाराष्ट्रातील मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्राने तीन ते दहा लाख लोकसंख्येच्या श्रेणीत ‘सर्वाधिक स्वच्छ शहर’ म्हणून प्रथम क्रमांक पटकावला. तसेच, सातारा जिल्ह्यातील कराड शहराने 50 हजार ते तीन लाख लोकसंख्येच्या शहरांमध्ये दुसरा क्रमांक मिळवला. याशिवाय पिंपरी-चिंचवड महापालिका ‘उदयोन्मुख स्वच्छ शहरांच्या’ यादीत स्थान पटकावणारे महाराष्ट्रातील एकमेव शहर ठरले.
स्वच्छता सर्वेक्षणात सन्मानित झालेल्या महाराष्ट्रातील शहरांमध्ये नवी मुंबई, पिंपरी चिंचवड, मिरा-भाईंदर, विटा, सासवड, देवळाली प्रवरा, पाचगणी, पन्हाळा यांचा समावेश होता. महाराष्ट्राबरोबरच गोव्यातील पणजी आणि साखळी या शहरांनाही पुरस्कार देण्यात आले.स्वच्छता क्षेत्रातील या यशामुळे महाराष्ट्रातील शहरी स्वच्छता व्यवस्थापन, जनसहभाग आणि प्रशासनाची कार्यक्षमता अधोरेखित झाली आहे.
अहमदाबाद, इंदूर शहराची चमकदार कामगिरी
या वर्षी प्रथमच सुरू करण्यात आलेल्या ‘सुपर स्वच्छ लीग’ या नव्या श्रेणीत इंदूर शहराने बाजी मारली, तर 10 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ‘देशातील सर्वात स्वच्छ शहर’ हा मान अहमदाबादला मिळाला. इंदूर शहर हे मध्य प्रदेशातील एक महत्त्वाचे औद्योगिक व सांस्कृतिक केंद्र आहे. इंदूरने स्वच्छतेच्या बाबतीत देशात सलग अनेक वर्षे पहिला क्रमांक पटकावला आहे. ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत इंदूरने केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. शहरात कचरा व्यवस्थापन अत्यंत प्रभावी पद्धतीने केले जाते. घराघरातून ओला व सुका कचरा वेगळा गोळा केला जातो. शहरात स्वच्छतेसाठी लोकांचा सहभागही मोठा आहे. रस्ते, बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखली जाते. इंदूर महापालिकेच्या नियोजनामुळे शहर सुंदर व स्वच्छ दिसते. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात येते. इंदूरचे हे यश देशातील इतर शहरांसाठी प्रेरणादायक ठरले आहे. स्वच्छतेसाठी इंदूर ही एक आदर्श उदाहरण आहे.






