महाराष्ट्रातील हवामानात सध्या कमालीची तफावत पाहायला मिळत आहे. कारण, मुंबईच्या काही भागात अचानक पावसाच्या सरी कोसळल्या. तर दुसरीकडे उर्वरीत राज्यभरात मात्र कमालीचा गारठा सध्या पाहायला मिळत आहे. हवामान बदलामुळे नागरिक मात्र सध्या हैराण आहेत. आज राज्यातील हवामान नेमके कसे असेल? याबाबत हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज नेमका काय आहे, ते सविस्तर जाणून घेऊ….
राज्यात आज कसे असेल हवामान ?
महाराष्ट्रात दिवसा हलका उकाडा जाणवत असला, तरी रात्री आणि पहाटे गार वाऱ्यांमुळे थंडी तीव्र होत आहे. उत्तर भारतात दाट धुके, कोल्ड वेव्ह आणि संभाव्य बर्फवृष्टीमुळे हवामानाने रौद्र रूप धारण केले आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम महाराष्ट्रातील तापमानावरही होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे एकुणच आगामी काही दिवसांत देखील राज्यातील थंडीचा कडाका असाच कायम राहण्याची शक्यता आहे. नववर्षाच्या सुरुवातीला मुंबईत पावसाची अनपेक्षित हजेरी, तर राज्याच्या अनेक भागांत तीव्र गारठा अशी मिश्र हवामानस्थिती पाहायला मिळत आहे. पुढील काही दिवसांत तापमानात किंचित बदल होईल, मात्र थंडीचा प्रभाव कायम राहणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पहाटेपासून मुंबई आणि परिसरात ढगांची गर्दी होती. वाशी आणि नवी मुंबईत पहाटेच पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर घाटकोपर, साकीनाका, कुर्ला आणि बीकेसी परिसरात जोरदार सरी कोसळल्या. सकाळी कामावर निघालेल्या नोकरदारांची या अवकाळी पावसामुळे चांगलीच धावपळ उडाल्याचे चित्र दिसून आले. ऐन हिवाळ्यात पावसाने अचानक एंट्री घेतल्याने तापमानात आणि वातावरणात मोठा बदल जाणवला. थंडी असतानाच पावसाच्या शिडकाव्यामुळे हवेत गारवा वाढला. मुंबईकरांसाठी हा पाऊस सुखद असला, तरी वाहतूक आणि दैनंदिन कामकाजाच्या दृष्टीने काहीसा त्रासदायक ठरला.
हवामानाच्या दृष्टीने पाहता राज्यात किमान तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. हवामान विभागानुसार आज किमान तापमानातील घट कायम राहण्याची शक्यता असून पुढील 2 दिवसांत तापमानात हळूहळू 2 ते 3 अंशांची वाढ होऊ शकते. मात्र, थंडीचा गारठा कमी होणार नसल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील किमान तापमानाबाबत बोलायचे झाल्यास परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात 7.5 अंश सेल्सिअस इतके नीचांकी तापमान नोंदले गेले. धुळे येथे 7.7 अंश, निफाड आणि गोंदिया येथे 8.2 अंश, जेऊर आणि नागपूर येथे 8.5 अंश, तर अमरावती येथे 8.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
महाराष्ट्रात थंडीत वाढ; आरोग्य जपा !
दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली आहे. आगामी काळात तापमानाचा पारा आणखी खाली येऊ शकतो. त्यामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. कडाक्याच्या थंडीत आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. थंड तापमानामुळे सर्दी, खोकला, ताप आणि सांधेदुखी यांसारख्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे शरीर उबदार राहील अशी कपडे घालणे, गरम पाणी पिणे आणि पौष्टिक आहार घेणे महत्त्वाचे आहे.
सकाळी कोमट पाण्याने अंघोळ करणे, वाफ घेणे आणि घरात पुरेशी हवेशीर व्यवस्था ठेवणे फायदेशीर ठरते. वृद्ध व्यक्ती, लहान मुले आणि अस्थमा किंवा हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी अतिरिक्त काळजी घ्यावी. व्यायाम करताना शरीरावर थंडीचा परिणाम होऊ नये म्हणून योग्य कपडे वापरावेत. पुरेसे पाणी पिणे आणि विश्रांती घेणेही आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.
थंडीत हृदयविकाराचा धोका वाढण्याची शक्यता अधिक असते. कारण, तापमान घटल्यामुळे शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि रक्तदाब वाढतो. अशा परिस्थितीत हृदयावर अतिरिक्त ताण येतो आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. विशेषतः मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल वाढणे किंवा आधीपासून हृदयाचे विकार असलेल्या व्यक्तींनी खास काळजी घेणे आवश्यक आहे.






