मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधु एकत्र आले आहेत. आज शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची संयुक्त परिषद पार पडली आहे. या पत्रकार परिषदेतून ठाकरे बंधुंनी मुंबईकरांसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. दादर येथील शिवसेना भवनात दोन्ही ठाकरे महापालिका निवडणुकांचा वचननामा प्रसिद्ध करण्यासाठी उपस्थित होते. विशेष म्हणजे 20 वर्षांनंतर राज ठाकरे शिवसेना भवनात दाखल झाले होते. या संयुक्त जाहीरनाम्यात मुंबईकरांसाठी कोणत्या घोषणा करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
शिवसेना आणि मनसेचा एकत्र वचननामा जाहीर
मुंबईकरांसाठी ठाकरे बंधुंनी शिवसेना उ.बा.ठा आणि मनसेचा वचननामा जाहीर करण्यात आला. यामध्ये नेमक्या प्रमुख घोषणा, प्रमुख मुद्दे काय आहेत ? त्या सविस्तर जाणून घेऊ…
- घरकाम करणाऱ्या महिलांची नोंदणी करून नोंदणीकृत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये स्वाभिमान निधी
- 10 रुपयात जेवण आणि नाश्ता
- नोकरदार पालक तसेच कष्टकरी महिलांना सांभाळणारी पाळणाघरे
- पाळीव प्राण्यासाठी दवाखाना
- बाळासाहेब ठाकरे स्वयं रोजगार अर्थसाह्य योजना
- मुंबई पालिकेतील अत्यावश्यक रिक्त पद भरणार
- प्रत्येक वार्डात आजी आजोबा मैदान
- 700 चौ फुटापर्यत मालमत्ता कर माफ कचरा कर रद्द
- महापालिकेच्या शाळा बिल्डरांच्या घशात जाऊ देणार नाही
- दहावीनंतर महापालिका शाळेत बारावीपर्यत ज्युनियर कॉलेज
- मुंबई पब्लिक स्कुलचा दर्जा अत्याधुनिक करणार
- मराठी शाळेत बोलतो मराठी हा हसत खेळत मराठी शिकवणारा डिजिटल उपक्रम सुरु करणार
- मुंबई महानगर पालिकेतर्फे बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सर्वात मोठं ग्रंथालय
- मुंबई चं सुपर स्पेशालिस्ट कॅन्सर रुग्णालय
- रॅपिड बाईक मेडिकल असिस्टंट ऍम्ब्युलन्स सेवा
- उत्तम दर्जाचे रस्ते बनवले जातील कंत्राटदाराकडून रस्त्याची 15 वर्षाची हमी घेतली जाईल
- सांडपाणी प्रक्रिया करणारे मल निसारण प्रकल्प उभारणार
- पाण्याला दर स्थिर ठेवून मुंबईकरांना पाणी उपलब्ध करून देणार
- फुटपाथ आणि मोकळ्या जागा
- खिशाला परवडणारा बेस्ट प्रवास
- महिला आणि विध्यार्थ्यांसाठी विशेष बेस्ट बसमध्ये मोफत प्रवास
- महापालिकेच्या पार्किंगमध्ये मोफत पार्किंग व्यवस्था
- प्रत्येक वार्डात मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स
- समुद्राचे पाणी गोड्या पाण्यात रूपांतर करून वापरण्यायोग्य करणार
- मुंबईतील नालेसफाई 12 महिने प्रक्रिया राबवणार
- मुंबईतील नागरिकांना 100 युनिटपर्यत वीज मोफत
बिनविरोध निवडणुका तात्काळ रद्द करा -ठाकरे
दादर येथील शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेत ठाकरे बंधुंनी अत्यंत आक्रमक अशा पद्धतीने आपली भूमिका मांडली. यामध्ये उद्धव ठाकरेंनी महायुतीतील पक्षांवर घणाघात केला. यामध्ये राज्यभरातील बिनविरोध झालेल्या सर्व निवडणुका रद्द कराव्यात, अशी मागणी यावेळी उध्दव ठाकरेंनी केली. शिवाय संबंधित जागांवरील निवडणूक प्रक्रिया पुन्हा नव्याने राबविण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली.
बिनविरोध विजयी उमेदवारांची चौकशी होणार
29 महापालिका निवडणुकींसाठी मतदान होण्यास अवघे 12 दिवस शिल्लक आहेत आणि निकाल जाहीर व्हायला 13 दिवस बाकी आहेत. मात्र, या निवडणुकांआधीच राज्यभरात एकूण 67 उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे. मात्र मुंबईसह राज्यातील बिनविरोध निवडणुकांची चौकशी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. विरोधी उमेदवारांवर दबाव, आमिष किंवा जबरदस्ती करून नामनिर्देशन मागे घेण्यास भाग पाडले गेले का, याची तपासणी करण्यात येणार आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत बिनविरोध निवडींची विजय घोषणा केली जाणार नाही, अशी माहितीही राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.






