सरकारने एकदाच काय तो दणका द्यावा, मनसे सरकारच्या सोबत असेल, पहलगाम हल्ल्यावरुन राज ठाकरेंची पोस्ट

Written by:Astha Sutar
Published:
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अशा दहशदवांद्यांना सरकारने एकदाच काय तो दणका द्यावा, बाकीच्यांचं माहित नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की सरकारच्या सोबत असेल, अशी पोस्ट सोशल मीडियावर राज ठाकरेंनी केली आहे.
सरकारने एकदाच काय तो दणका द्यावा, मनसे सरकारच्या सोबत असेल, पहलगाम हल्ल्यावरुन राज ठाकरेंची पोस्ट

raj thackeray

मुंबई – मंगळवारी काश्मीरमधील पहलगाममधी दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. यात महाराष्ट्रातील ६ पर्यटकांचा समावेश आहे. या भ्याड हल्लाचा निंदा केली जात आहे. निषेध केला जात असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अशा दहशदवांद्यांना सरकारने एकदाच काय तो दणका द्यावा, बाकीच्यांचं माहित नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की सरकारच्या सोबत असेल, अशी पोस्ट सोशल मीडियावर राज ठाकरेंनी केली आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र निषेध व्यक्त करत आहे. या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली… असंही पोस्टमध्ये म्हटले आहे.

दहशतवाद्यांना कायमच संपवलं पाहिजे…

ही घटना अतिशय गंभीर आहे आणि या प्रसंगात सरकारच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे उभी राहील. केंद्र सरकारने या हल्लेखोरांचा आता असा बंदोबस्त करावा की या हल्लेखोरांच्या पुढच्या १० पिढ्यांच्या ते आठवून सुद्धा थरकाप उडायला हवा… १९७२ साली म्युनिक ऑलिम्पिकच्या वेळेस इस्रायली खेळाडूंवर पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी हल्ला केला… यानंतर इस्रायलने या अतिरेक्यांना, या हल्ल्याच्या सूत्रधारांना अशा पद्धतीने मारलं होतं की पुढे दीर्घकाळ पॅलेस्टिनी लोकांच्या मनात दहशत बसली होती. भारताचे आणि इस्रायलचे संबंध उत्तम आहेत… केंद्र सरकार इस्रायल सरकारच्या पाऊलावर पाऊल टाकून या दहशतवाद्यांना आणि त्यांच्या मागच्या एकूण एक पाठीराख्याना कायमच संपवेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. या हल्ल्याबद्दल वाचताना एक धक्कादायक गोष्ट समोर आली…

गोळ्या झाडताना समोरच्याच्या धर्म विचारला…

एका प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितलं की हल्लेखोरांनी गोळ्या झाडताना समोरच्याच्या धर्म विचारला… ही तुमची मुजोरी? मी अनेकदा माझ्या भाषणात म्हणतो तसं की या देशात आमच्या हिंदूंवर जर कोणी अंगावर याल तर आम्ही सगळे हिंदू म्हणून एकत्र येऊन तुमच्या अंगावर जाऊ… या हल्लेखोरांच्या मागचे सूत्रधार कुठेही लपले असू देत त्यांना आपली शक्ती काय आहे हे कळलंच पाहिजे… केंद्र सरकारने काश्मीरमधून ३७० कलम हटवलं. त्यानंतर सगळं जरा सुरळीत होत आहे आणि पर्यटकांचा ओघ वाढला आहे असं दिसत असताना, जर असा हल्ला झाला तर भविष्यात काश्मीरमध्ये जमीन विकत घेऊन, उद्योगधंदे कोण सुरु करेल ? त्यामुळे केंद्र सरकारने याचा विचार करून ठोस कृती आखावी…. हे सगळं करताना केंद्र सरकार कठोर होईल याबद्दल माझ्या मनात कुठलीच शंका नाहीये… आणि त्यांच्या मागे या देशातील सगळे राजकीय पक्ष उभे राहतील. सरकारने एकदाच काय तो दणका द्यावा, बाकीच्यांचं माहित नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की सरकारच्या सोबत असेल. राज ठाकरे। असं राज ठाकरेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सरकारतर्फे सर्वतोपरी मदत करणार – मुख्यमंत्री

पुण्यातील संतोष जगदाळे यांना काश्मिरमधील भ्याड दहशतवादी हल्ल्यात गोळ्या लागल्या असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या पत्नी सुद्धा जखमी झाल्याची माहिती आहे. त्यांच्या पुण्यातील परिवारजनांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीवरुन संवाद साधला आणि त्यांना राज्य सरकारतर्फे सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews