Marathi News

सरकारचा रक्षसी बहुमताचा अहंकार गळून पडला! मराठी अस्मितेचा विजय झाला, काँग्रेसची प्रतिक्रिया

Written by:Astha Sutar
Published:
हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्रभर निर्माण झालेल्या जनआक्रोशासमोर अखेर महाभ्रष्ट महायुती सरकारला नमते घ्यावे लागले.
सरकारचा रक्षसी बहुमताचा अहंकार गळून पडला! मराठी अस्मितेचा विजय झाला, काँग्रेसची प्रतिक्रिया

Congress – नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार त्रिभाषा सूत्राला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत हिंदी सक्तीचा जीआर रद्द केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. याबाबत दोन्ही जीआर रद्द केले आहेत. दरम्यान, त्रिभाषेचा दोन जीआर सरकारने रद्द केल्यानंतर यावर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येत असताना, आता यावर सरकारचा रक्षसी बहुमताचा अहंकार गळून पडला! मराठी अस्मितेचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.

जनआक्रोशासमोर महाभ्रष्ट महायुतीला नमते घ्यावे लागले…

हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्रभर निर्माण झालेल्या जनआक्रोशासमोर अखेर महाभ्रष्ट महायुती सरकारला नमते घ्यावे लागले. विरोधी पक्षांनी घेतलेला ठाम पवित्रा, मराठी भाषाप्रेमी नागरिक संस्थांचा जोरदार विरोध आणि सोशल मीडियावर पेटलेली लाट या सर्वांच्या परिणामी सरकारने हिंदी सक्तीचे दोन्ही शासन आदेश रद्द केले आहेत.

पण यापुढेही आपणा सर्वांना सजग रहावे लागेल. सत्तेत बसलेले लोक मायावी आहेत. त्यांची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हिंदी -हिंदू – हिंदूराष्ट्र हा अजेंडा राबविण्याचा प्रयत्न ते पुन्हा करतील आपण तो पुन्हा हाणून पाडू जय महाराष्ट्र ! अशी पोस्ट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियावर केली आहे.

मराठी शक्तीसमोर सरकार झुकलं!

“अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने हिंदी सक्तीबाबत घेतली माघार. हा मराठी जनतेच्या स्वाभिमानाचा, अस्मितेचा विजय आहे! मराठी शक्तीसमोर सरकार झुकलं!” अशी सोशल मीडियावर पोस्ट काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तर सरकारने जीआर रद्द केल्यानंतर विविध क्षेत्रातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews