Marathi News

ज्या रॅपिडोवर कारवाई, त्याच कंपनीकडून प्रो. गोविंदा स्पर्धेला प्रायोजक, विरोधकांचा प्रताप सरनाईकांवर गंभीर आरोप

Written by:Astha Sutar
Last Updated:
जर पारदर्शकता आणि नैतिकता शिल्लक असेल तर या प्रकाराची तातडीने चौकशी करा आणि दोषींवर कारवाई करा. अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई अध्यक्ष अमोल मातेलेंनी केली आहे. तसेच मंत्री प्रताप सरनाईकांवर टिकास्त्र डागले आहे. 
ज्या रॅपिडोवर कारवाई, त्याच कंपनीकडून प्रो. गोविंदा स्पर्धेला प्रायोजक, विरोधकांचा प्रताप सरनाईकांवर गंभीर आरोप

Pratap Sarnaik : पावसाळी अधिवेशनाच्या वेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी “रॅपिडो” कंपनीविरोधात फिल्मी स्टाईलमध्ये कारवाई करत, ॲपवरून बुकिंग घेणाऱ्या बाईक सेवा बंद करण्याची भाषा केली होती. स्वतः सरनाईक यांनीच रॅपिडो बाईक थांबवून मोठा गाजावाजा करत ती कारवाई केली होती. मात्र राज्यातील सत्ताधारी सरकारचा दुटप्पी आणि भ्रष्ट कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. अशी बोचरी टिका विरोधकांनी केली आहे.

सत्तेचा वापर कौटुंबिक कार्यक्रमासाठी…

दरम्यान, मंत्री प्रताप सरनाईक यांचा खरा चेहरा समोर आला आहे, अशी टिका आमदार रोहित पवारांनी केली आहे. ज्या कंपनीविरोधात कारवाई करणार असल्याची गर्जना मंत्री महोदयांनी केली होती, तीच रॅपिडो कंपनी आता प्रताप सरनाईक यांच्या पुत्राने आयोजित केलेल्या प्रो. गोविंदा स्पर्धेला प्रायोजक म्हणून उभी राहते. हा प्रकार म्हणजे लोकांची फसवणूक आहे. विरोधकांवर कारवाई करण्याची नाटकं करायची आणि मग सत्तेचा वापर करून त्याच कंपन्यांना कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी करून घ्यायचं हा भ्रष्टाचार नाही तर काय? असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.

‘डील’ साइन करण्याचे पेन?

ही सरकारची ढोंगी नैतिकता आणि नैतिक दिवाळखोरीचा सर्वोच्च टप्पा आहे. सामान्य नागरिकांना नियम दाखवायचे आणि आपल्या राजकीय सोयीसाठी त्याच कंपन्यांसोबत एक आर्थिक देवाणघेवाण करायची हीच भाजप सरकारची ‘डबल स्टँडर्ड’ राजकारणाची ओळख आहे. जर ती कंपनी कायद्याचे उल्लंघन करत होती, तर आता तिच्या प्रायोजकत्वाचा स्वीकार का?

कायदा सामान्य नागरिकांसाठी वेगळा आणि मंत्र्यांच्या घरच्यांसाठी वेगळा का? एका हातात कारवाईची तलवार आणि दुसऱ्या हातात ‘डील’ साइन करण्याचे पेन? अशी टिका राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई अध्यक्ष अॅड. अमोल मातेलेंनी केली आहे.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews