नागपूर ग्रामीणमध्ये अंगावर वीज कोसळल्याने दोन महिलांचा अंत; वीजेपासून कसा करावा बचाव?

Written by:Rohit Shinde
Published:
चारगाव शिवारात शुक्रवारी दुर्दैवी घटना घडली. वीज कोसळून दोन महिला शेतमजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. वीजेपासून नेमका बचाव कसा करावा?
नागपूर ग्रामीणमध्ये अंगावर वीज कोसळल्याने दोन महिलांचा अंत; वीजेपासून कसा करावा बचाव?

नागपूरच्या ग्रामीण भागातील रामटेक तालुक्यातील चारगाव शिवारात शुक्रवारी दुर्दैवी घटना घडली. वीज कोसळून दोन महिला शेतमजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पाच महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. शेतात  धान रोवणीचे काम सुरू असताना अचानक आकाशातील संकटामुळे दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अशा वीजांपासून कसा बचाव करावा, नागपूरमध्ये नेमकी काय घटना घडली ते समजून घेऊ…

नेमकी काय घटना घडली?

रामटेक तालुक्यातील चारगाव शिवार येथील शितलवाडी-चारगाव रस्त्यालगत असलेल्या शेतकरी रमेश जगन्नाथ रहाटे यांच्या शेतात ही घटना घडली. मृत महिलांची नावे मंगलाबाई झिबल मोटघरे (४०, रा. शितलवाडी, परसोडा) आणि वर्षा देवचंद हिंगे (३३, रा. भोजापूर) अशी आहेत. दोघीही अनुभवी आणि नियमित मजुरी करणाऱ्या महिला होत्या. शुक्रवारी दुपारी सुमारास सुमारे २५ महिला धान रोवणीसाठी शेतात काम करत होत्या. त्यातील सात महिला जेवणासाठी थोडे बाजूला झाडाखाली बसल्या होत्या. त्याचवेळी वीजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. काही क्षणांतच प्रचंड गडगडाट करत वीज थेट या महिलांच्या दिशेने आली आणि त्या जागीच कोसळल्या. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

वीजेपासून कसा बचाव करावा?

शेतात काम करताना कोसळणाऱ्या वीजेपासून बचाव करणे अत्यंत गरजेचे आहे. विजेच्या गडगडाटासह आकाशात चमक दिसताच त्वरित उघड्यावरचे काम थांबवावे. झाडांखाली, लोखंडी संरचना किंवा वीजेच्या खांबांजवळ थांबू नये. शक्य असल्यास जवळच्या सुरक्षित इमारतीत किंवा वाहनात आश्रय घ्यावा. विजेच्या गडगडाटाच्या आवाजानंतर लगेच जमिनीवर झुकून, दोन्ही पाय एकत्र करून बसावे, पण आडवा पडू नये. धातूची साधने, ट्रॅक्टर, मोटरपासून दूर राहावे. शेतात विजेचा धोका ओळखून कामाची वेळ नियोजनपूर्वक ठेवावी. विजेचा अंदाज असल्यास पूर्वतयारी करावी. रेडिओ, मोबाईलद्वारे हवामानाची माहिती घ्यावी. सतर्क राहून आणि योग्य खबरदारी घेतल्यास कोसळणाऱ्या वीजेपासून जीवित हानी टाळता येते.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews