Education Minister Dada Bhuse – मुंबई महानगरपालिका हद्दीत खासगी आणि अनुदानाशिवाय चालणाऱ्या एकूण १०५७ शाळा आहेत. यामधील २१८ शाळांनी पुनर्मान्यता घेतलेली नाही. अनधिकृत शाळांच्या संदर्भात सरकार गंभीर आहे. मुंबई विभागात एकूण ४२० अनधिकृत शाळा असून यापैकी १०३ शाळांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. १२६ शाळांवर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच ४७ शाळा कायमस्वरूपी बंद करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिक्षणमंत्री दादाजी भुसेंनी विधानसभेत दिली.
साहित्य खरेदी करण्याची भुभा पाहिजे…
दरम्यान, उर्वरित प्रकरणांची चौकशी सुरू आहे. विधानसभेत शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आमदार भास्कर जाधव यांच्या प्रश्नाला उत्तर देताना भुसे म्हणाले की, सरकारकडून वेळोवेळी अशा शाळांवर कारवाई केली जाते. तपासात ज्या शाळा अनधिकृत असल्याचे आढळून आले, त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. विद्यार्थ्यांना आणि पालकांना हवी तेथून साहित्य खरेदी करण्याची मुभा असली पाहिजे.
साहित्य खरेदीसाठी स्वतंत्र नियमावली…
शाळांमध्ये फी वाढ, विद्यार्थ्यांचे गणवेश, वह्या, पुस्तके व शालेय साहित्य खरेदीसाठी सक्ती यावर भाजप आमदार योगेश सागर यांनी प्रश्न उपस्थित केला. शासनाने यासंदर्भात निर्देश जारी केले आहेत की दर दोन वर्षांनी जास्तीत जास्त १५ टक्केपर्यंतच फी वाढवता येईल. जर शाळांनी हा आदेश पाळला नाही, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तसेच राज्यातील कोणत्याही शाळेला विद्यार्थ्यांना गणवेश, वह्या, पुस्तके किंवा साहित्य कोणत्या एका दुकानातून घेण्यास भाग पाडता येणार नाही. लवकरच राज्य सरकार शालेय साहित्य खरेदीसाठी स्वतंत्र नियमावली जाहीर करणार आहे.





