J.P. Nadda : मुंबईसह राज्यात सध्या गणपती सणाची धामधूम आहे. मुंबईत लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी देशातून भाविक येतात. दरम्यान, काल (शनिवार) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचं सहकुटुंब दर्शन घेतलं होते. यानंतर आज (रविवार) केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी. नड्डा यांनी लालबागचा राजाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते गणरायाची पूजा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, रवींद्र चव्हाण, अमित साटम आदी उपस्थित होते.
नड्डा यांचा मुख्यमंत्र्यांकडून सत्कार
दरम्यान, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी. नड्डा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री नड्डा यांचे गणेश मूर्ती, शाल, श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मातोश्री सरीता फडणवीस, पत्नी अमृता फडणवीस तसेच नड्डा यांच्या कुटुंबातील सदस्य व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, जे.पी. नड्डा यांनी लालबागचा राजाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या हस्ते गणरायाची पूजा करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांकडून लालबागच्या राजाचं कौतूक
दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी लालबागच्या राजाच्या मंडळाच्या व्यवस्थापनाचं कौतुक केलं आणि गणेशोत्सवाच्या शांततापूर्ण आयोजनासाठी प्रशासनाला पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिलं. “लालबागचा राजा हा मुंबईच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचा अविभाज्य भाग आहे. येथील भक्ती आणि उत्साह पाहून मनाला आनंद होतो.” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. नड्डा यांनी गणपतीचे दर्शन घेतले, त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री मंगल प्रभात लोढा, आशिष शेलार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.





