विधानसभा हा ट्रेलर पूर्ण पिक्चर पालिकेत दाखवू, गल्लीचे राजकारण करणाऱ्यांना दिल्ली व जग काय कळणार? श्रीकांत शिंदेंची उबाठावर सडकून टीका

Written by:Astha Sutar
Last Updated:
शिष्टमंडळांचा परदेश दौरा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून केल्याची टीका करणाऱ्यांचा खासदार डॉ. शिंदे यांनी खरपूस समाचार घेतला. त्यांना विधानसभेत ट्रेलर दाखवला आणि आता महापालिकेत पिक्चर दाखवू, असा इशारा खासदार डॉ. शिंदे यांनी उबाठा गटाला दिला.
विधानसभा हा ट्रेलर पूर्ण पिक्चर पालिकेत दाखवू, गल्लीचे राजकारण करणाऱ्यांना दिल्ली व जग काय कळणार? श्रीकांत शिंदेंची उबाठावर सडकून टीका

Shrikant Shinde – शिवसेनेच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार मिलिंद देवरा यांची ऑपरेशन सिंदूर व परदेश दौऱ्याचे अनुभव उलगडणारी प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी खासदार शिंदे यांनी परदेश दौऱ्यातील आठवणींना उजाळा दिला. गल्लीत राजकारण करणाऱ्यांना दिल्ली आणि जगाचे काय करणार? असा सवाल श्रीकांत शिंदेंंनी उपस्थित करत उबाठा गटावर सडकून टीका केली.

१४० कोटी जनतेचा संदेश जगभरात पोहचविण्याची संधी

दरम्यान, १४ दिवसांच्या या दौऱ्यात ज्येष्ठ नेत्यांकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. शिष्टमंडळातील सर्वच वयाने आणि अनुभवाने मोठे होते. यूएई, काँगो प्रजासत्ताक, सिएरा लिओन आणि लायबेरिया या देशांतील प्रमुखांशी चर्चा केली. दोन देशांच्या संसदेत भाषण करण्याची संधी मिळाली हा आपल्या कारकिर्दितील मोठा अनुभव असून तो भविष्यात नक्कीच फायदेशीर ठरेल. ऑपरेशन सिंदूरनंतर भारताच्या १४० कोटी जनतेचा संदेश जगभरात पोहोचवण्यासाठी शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे, ही आयुष्यातील मोठी संधी आहे.

पंतप्रधानांकडून कामाचे कौतुक…

दरम्यान, परदेशात एका कार्यक्रमात शिष्टमंडळातील डॉ. सस्मित पात्रा यांनी भाषणात माझा उल्लेख भाऊ म्हणून केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भाऊ म्हणून उल्लेख केला आणि कामाचे कौतुक केले. यावरुन पंतप्रधान मोदी हे सातही शिष्टमंडळांच्या दौऱ्यावर बारीक लक्ष ठेवून होते. शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याबाबत जेव्हा केंद्र सरकारकडून विचारणा झाली तेव्हा मनात दडपण आले होते. खासदारांच्या शिष्टमंडळांचे परदेश दौऱ्यांचे महत्व हे संजय राऊत आणि आसिफ मुनीर यांना कळणार नाही, कारण त्यांची ती कुवत नाही, अशी टीका खासदार देवरांनी केली.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews