एमपीएससी, युपीएससी या स्पर्धा परीक्षांच्या रणात अनेक विद्यार्थी उतरत असतात. सुरूवातील आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे-पाटलांसारखे अधिकारी या पिढीली मार्गदर्शक ठरतात. सामान्य कुटुंबातील मुलगा ते आयपीएस अधिकारी असा विश्वास नांगरे-पाटलांचा प्रवास अनेकांना थक्क करतो. त्यांची अनेक प्रेरणादायी भाषणे आजही ऐकली जातात. याच विश्वास नांगरे-पाटलांची एक फेसबुक पोस्ट सध्या जाम चर्चेत आहे. त्या पोस्टमध्ये शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरेल, असे लेखन नांगरे-पाटलांनी केले आहे.
फेसबूक पोस्टवर नांगरे-पाटील म्हणतात…
“कोकरूडच्या जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतून शिराळ्याला सातवी इयत्तेत न्यू इंग्लिश स्कुलमध्ये प्रवेश घेतला. मन रुळत नव्हते. सारखं गावाला जायची ओढ लागायची. कोकरूडला बारा महिने वाहत्या वारणा नदीत मनसोक्त डुंबायची सवय होती. शिराळ्याच्या मोरणा माई मध्ये फक्त पावसाळ्यातच वाहत पाणी असायचं. कोकरूडचे जिप शाळेतले विजार किंवा धोतर सदऱ्यातले मास्तर प्रेमळ होते. अभ्यासापेक्षा व्यायामावर भर असायचा. शासकीय पोषण आहार योजनेतले दूध मनसोक्त प्यायला मिळायचे. नव्या शाळेतले शिक्षक इस्त्री केलेले शर्ट पॅन्ट घालून यायचे. शाळेत भलती शिस्त होती.
सगळे वर्ग वेळेवर व्हायचे. मुख्याध्यापक दिगवडेकर सरांचा आवाज आला तर सगळीकडे चिडीचूप व्हायची. लवटे सरांच्या छडीने हात फुरफुर सुजायचा. छडी लागे छमछम विद्या येई घमघम. जोर जबरदस्तीने का होईना, हळूहळू अभ्यासाची गोडी लागली. स्पर्धा आवडायला लागली. दर महिन्याला चाचणी परीक्षा व्हायची. प्रत्येक परीक्षेची पायरी जिद्दीने चढायला सुरु केली. कष्टाला यशाची जोड मिळाली आणि मला सरस्वती माता प्रसन्न झाली. शास्त्र गणितात सूर गवसला. भाषा अध्ययनाचा नाद लागला. आणि दिव्य म्हणजे, आठव्या इयत्तेत चार तुकड्यामध्ये चारी मुंड्या चीत करून मिळून पहिला क्रमांक मिळवला. मग मात्र कधी वळून मागे पाहिले नाही.” असे म्हणत त्यांनी 8 वीचा निकाल देखील शेअर केला आहे. शालेय जीवनातील चढउतारांना तोंड देताना विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकतो.
नांगरे-पाटील तरूणांच्या गळ्यातील ताईत
विश्वास नांगरे-पाटील हे महाराष्ट्रातील तरुणांसाठी खऱ्या अर्थाने प्रेरणास्थान मानले जातात. पोलिस सेवेत कार्यरत असताना त्यांनी दाखवलेली प्रामाणिकता, शिस्तबद्ध कामाची पद्धत आणि जनतेशी असलेला संवाद यामुळे ते लोकांच्या मनात घर करून आहेत. तरुणांना प्रामाणिकपणे अभ्यास करण्याची, कठोर परिश्रम करण्याची आणि शिस्तीने जीवन जगण्याची प्रेरणा ते सतत देतात. त्यांच्या व्याख्यानांमुळे आणि पुस्तकांमुळे अनेक तरुणांच्या विचारसरणीत सकारात्मक बदल झाला आहे. “तरुणांच्या गळ्यातील ताईत” ही उपाधी त्यांना त्यांच्या कार्यामुळे लाभली आहे. विश्वास नांगरे-पाटील हे केवळ पोलिस अधिकारी नसून तरुणांसाठी आदर्श मार्गदर्शक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत.