Marathi News

कृष्णा, पंचगंगा, वारणेची पाणीपातळी वाढली; सांगली-कोल्हापुरला यंदा पुराचा धोका?

Written by:Rohit Shinde
Published:
गेल्या काही दिवसांत झालेल्या तुफान पावसामुळे कृष्णा, पंचगंगा, वारणा या नद्यांची पाणी पातळी वाढली आहे, अलमट्टी धरणात पाणी वाढले आहे. त्यामुळे सांगली - कोल्हापुरात पुराची स्थिती निर्माण होऊ शकते.
कृष्णा, पंचगंगा, वारणेची पाणीपातळी वाढली; सांगली-कोल्हापुरला यंदा पुराचा धोका?

2019 साली सांगली – कोल्हापुरात निर्माण झालेली पुरस्थिती अवघ्या राज्याने पाहिलेली आहे. अशा परिस्थितीत राज्यात यंदा मे महिन्यातच तुफान पाऊस कोसळला आहे. विशेष म्हणजे सांगली, सातारा आणि कोल्हापुरात जिल्ह्यात मोठा पाऊस झाला आहे. परिणामी कृष्णा, पंचगंगा, वारणा या प्रमुख नद्यांची पाणीपातळी झपाट्याने वाढली आहे. अलमट्टी धरणातून योग्य प्रकारे विसर्ग नाही झाला आणि नद्यांच्या खोऱ्यात आणखी पाऊस झाला तर या भागात पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुसळधार पावसामुळे सांगलीत बंधारे पाण्याखाली

सांगली जिल्ह्यात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे कृष्णा वारणा नदीपात्राच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे अनेक छोटे मोठे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. म्हैसाळ येथील कृष्णा नदीवर असणारा बंधारा पाण्याखाली गेला असून या ठिकाणी मासे पकडण्यासाठी तरुणांची गर्दी होताना पाहायला मिळत आहे. शिवाय सातारा जिल्ह्यातील अनेक नद्यांतून कृष्णा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे कृष्णेच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. 

सांगली-कोल्हापुरात पुरस्थिती निर्माण होण्याची चिन्हे

अलीकडेच कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची पाच मीटरने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फटका सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला बसेल आणि पावसाळ्यात पुन्हा पूरस्थितीला तोंड द्याव लागेल म्हणून कृष्णा नदीकाठचे रहिवासी भीतीच्या छायेखाली आहेत. पूराच्या कारणांविषयी स्थानिक नेते आणि राजकीय नेत्यांमध्ये मतभेद आहेत. महाराष्ट्र सरकारनेही आपली भूमिका स्पष्ट करत कर्नाटक सरकारच्या निर्णयाला विरोध केला आहे.

अशा परिस्थितीत पावसाच्या आणि पुरस्थितीच्या काळात राज्य सरकारने कर्नाटक सरकारसोबत संवाद ठेवणे अत्यंत जरूरीचे आहे. सांगली, कोल्हापुर आणि साताऱ्यातील कृष्णा, कोयना, पंचगंगा, वारणा या नद्यांच्या खोऱ्यात अधिक पाऊस कोसळताच अलमट्टीतला विसर्ग वाढवणे जरूरीचे आहे. तेव्हाच या भागातील पुरस्थिती नियंत्रणात ठेवणे शक्य होऊ शकते.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews