ऐन पावसाळ्यात कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रहिवाशांनी पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. कल्याण आणि डोंबिवलीत पाणीपुरवठा उद्या मंगळवारी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या कालावधीत बंद राहणार आहे, म्हणजेच तब्बल सात तास. यासंदर्भातील अधिकृत माहिती कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जारी केली आहे. नागरिकांनी या कालावधीत पाण्याची योग्य प्रमाणात साठवण करून ठेवण्याचे आवाहन केडीएमसीने केले आहे.
7 तास पाणीपुरवठा राहणार बंद
मंगळवारी 9 सप्टेंबर 2025 रोजी शहराचा पाणीपुरवठा सुमारे 7 तास बंद राहणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. यामुळे नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा आणि पाणी जपून वापरावे असे आवाहन कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे. नागरिकांनी गरजेपुरता आणि आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा असे आवाहन करण्यात आले आहे.
देखभाल दुरूस्तीच्या कामामुळे निर्णय
कल्याण-डोंबिवलीत पाणीपुरवठा करणाऱ्या 150 दशलक्ष लिटर क्षमतेच्या मोहिली उदंचन केंद्राशी संबंधित नेतिवली जलशुद्धीकरण केंद्र आणि 100 दशलक्ष लिटर क्षमतेच्या मोहिली जलशुद्धीकरण केंद्राला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमार्फत टाटा पॉवर कांबा सबस्टेशनवरून वीज पुरवठा केला जातो. कांब्याच्या सबस्टेशनमधील एनआरसी-2 फीडरची देखभाल व दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत या केंद्रांना वीज पुरवठा बंद राहणार आहे. परिणामी पाणीपुरवठा बंद राहील.
या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामामुळे कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यामध्ये कल्याण पूर्व-पश्चिम, कल्याण ग्रामीण भागातील मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी व इतर गावे आणि डोंबिवली पूर्व-पश्चिम या परिसरांचा समावेश आहे. पाणीकपातीमुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. नागरिकांमध्ये मात्र यामुळे काहीशी संतापाची भावना पाहायाल मिळत आहे.






