Weather Update: महाराष्ट्रात पाऊस पुन्हा बरसणार? पुढील 7 दिवस काही भागात पावसाचा अंदाज

Written by:Rohit Shinde
Published:
महाराष्ट्राच्या काही भागात 14 ते 20 ऑक्टोबरच्या काळात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पूर्ण नाहीसा झालेला पाऊस पुन्हा हजेरी लावणार का? असा सवाल उपस्थित राहिला आहे.
Weather Update: महाराष्ट्रात पाऊस पुन्हा बरसणार? पुढील 7 दिवस काही भागात पावसाचा अंदाज

महाराष्ट्रातील पावसाबाबत हवामान विभागाकडून मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यातून पूर्ण नाहीसा झालेला पाऊस पुन्हा बरसतोय की काय? असा सवाल हवामान विभागाच्या नव्या अंदाजामुळे निर्माण झाला आहे. पुढील आठवडाभर म्हणजेच 14 ते 20 ऑक्टोबर या काळात राज्याच्या काही भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ऐन खरीपाच्या सुरूवातीला पावसामुळे राज्यात काही नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये सध्या निर्माण झाली आहे.

मराठवाड्यात पुन्हा पाऊस बरसणार?

15 ते 16 ऑक्टोबर ला संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता अधिक जाणवत असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात येत आहे. मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असल्याने घाबरुन जाण्याची गरज नाही. कारण, सध्या पावसाचा जोर कमी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात आणि सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. उभी पिक वाहून गेली आहेत. जमिनी देखील वाहून गेल्या आहेत. त्यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली या 8 जिल्ह्यांत 16 ऑक्टोबरपर्यंत स्वच्छ सूर्यप्रकाश आणि कोरडे हवामान राहील. त्यानंतर म्हणजे 16 ऑक्टोबरनंतर या भागात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

रब्बी हंगामातील चौथ्या आवर्तनातील शेवटच्या चरणातील कालावधीत तसेच ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यातील पाचव्या व शेवटच्या आवर्तनातील अपेक्षित पावसाचे स्वरुप पाहता, रब्बीच्या लागवडी व शेतकामासाठी हा पाऊस लाभदायीच ठरू शकतो. हा मध्यम स्वरूपाच्या पावासाचा अंदाज साधारणपणे 20 ऑक्टोबरपर्यंत कायम राहणार आहे.

लवकरच पाऊस निरोप घेणार !

दरम्यान, नैऋत्य मान्सूनची माघार पूर्ण झाल्यानंतर दक्षिण भारतात ईशान्य मान्सूनचा पाऊस सुरू होतो. त्याचा काही परिणाम महाराष्ट्रावरही दिसू शकतो. दिवाळीच्या सुमारास राज्यात पुन्हा एकदा पावसाचे ढग निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. अशी स्थिती असली तरी,  नैऋत्य मान्सूनने राज्यातून माघार घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुंबईसह उत्तर महाराष्ट्र आणि राज्याच्या उत्तरेकडील जिल्ह्यांतून मान्सून मागे सरकला असून, पुढील 1-2 दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सूनची माघार पूर्ण होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचे प्रमाण घटले असून बहुतांश भागांत कोरडे हवामान अनुभवास येत आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews