Jayakwadi Dam : जायकवाडी धरण किती भरलं? निम्म्या मराठवाड्याचा पाणीप्रश्न सुटणार का?

Written by:Smita Gangurde
Published:
धरणातील विसर्गामुळे अनेक नद्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाली असून गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Jayakwadi Dam : जायकवाडी धरण किती भरलं? निम्म्या मराठवाड्याचा पाणीप्रश्न सुटणार का?

गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना झोडपून काढलं आहे. धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे रस्त्यांवर नदी उतरली आहे. लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. धरणं ओव्हर फ्लो झाली आहेत. धरणातील विसर्गामुळे अनेक नद्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाली असून गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जायकवाडी धरण ९७ टक्क्यांवर

पैठणमधील जायकवाडी धरण (नाथसागर जलाशय) नियंत्रण कक्षाकडून महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे. उद्या २१ ऑगस्ट रोजी सकाळी 6:00 वा. ते 7:00 वाजेदरम्यान जायकवाडी धरणाच्या सांडव्याद्वारे गोदावरी नदी पात्रात 9432 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. जायकवाडी धरणाचे एकूण 18 दरवाज्यांपैकी प्रत्येकी 0.5 फुटाने उघडण्यात येणार आहे. एकूण 9432 क्युसेक विसर्ग सुरू होणार आहे.

धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल. तरी कुणीही गोदावरी नदीपात्रात प्रवेश करू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. कुठलीही जीवित वा वित्त हानी होऊ नये या करिता नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घेण्याची विनंती करण्यात आली आहे.

जायकवाडी धरणातून दुसऱ्यांदा पाणी सोडलं जाणार आहे. जायकवाडी धरणातून निम्म्या मराठवाड्याला पाणी पुरवठा केला जातो. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, जालना, बीड या पाच जिल्ह्यांना जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. आतापर्यंत जायकवाडी धरण ९७ टक्क्यांपर्यंत भरलं आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातून पुढील 48 तासात कोणत्याही क्षणी पाणी सोडलं जाणार आहे. नाशिकमधील धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने जायकवाडी धरणाची आवक वाढली जाणार असल्याची माहिती आहे. गोदावरी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

खडकवासला धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

खडकवासला धरण क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. दौंड बंधाऱ्यातून उजनी धरणात तब्बल एक लाख 41 हजार 407 क्युसेकने पाण्याचा प्रवाह येतो. सध्या भीमा नदीचा पात्र दुथड भरून वाहत असून प्रशासनानं नदीकडच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Follow Us :GoogleNews