Marathi News

लाडक्या बहिणींच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट; सप्टेंबरमधील ‘या’ तारखेला मिळणार पैसे?

Written by:Rohit Shinde
Published:
लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा महिलांना लागून राहिली आहे. त्यामध्ये आता मोठी अपडेट समोर येत आहे. येत्या आठवडाभरात महिलांच्या खात्यामध्ये पैसे येतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
लाडक्या बहिणींच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट; सप्टेंबरमधील ‘या’ तारखेला मिळणार पैसे?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा लाभ अद्याप महिलांना मिळालेला नाही. त्यामुळे हा लाभ कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. आता याबद्दलची मोठी अपडेट समोर आलेली आहे. त्यामुळे नेमके कोणते कोणत्या तारखेला पैसे येणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. राज्य सरकारने गेल्यावर्षी सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतंर्गत पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. ऑगस्ट महिन्याच्या हप्त्या कधी येणार या प्रतीक्षेत आता महिला आहेत.

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पैसे मिळणार?

जुलै महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर आता ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट लाडक्या बहिणी पाहत आहेत. मात्र, ऑगस्ट महिना संपला तरी हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व लाडक्या बहिणीच्या नजरा लागल्या आहेत. सरकारकडून सहसा सणासुदीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात योजनेचा लाभ जमा केला जातो. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस गणेशोत्सवाला सुरुवात झाली. त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा लाभ गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा केला जाईल अशी दाट शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, गणेश चतुर्थीला लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाला नाही. त्यामुळे आता सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा नाही.

अपात्र महिलांकडून लाडकी बहीण योजनेचा लाभ

राज्यभरातील 1183 जिल्हा परिषद महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती महिला व बालविकास विभागाने सरकारला दिली. या कर्मचाऱ्यांवर नागरी सेवा नियमांतर्गत कार्यवाही करण्यासाठी सर्व जिल्हा परिषदेच्या सीईओंना आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे, बोगस माहिती देत लाडकी बहीण योजनेचे दरमहा 1500 रुपये घेणाऱ्या जिल्हा परिषदेतील महिला कर्मचाऱ्यांवर आता कारवाईची टांगती तलवार आहे. लाभार्थी महिलांची स्क्रुटीनी होत असून दररोज नव्याने बोगस लाभ घेणारे लाभार्थी समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी राज्यातील तब्बल 26 लाख लाभार्थी बोगस असल्याचे समोर आले होते. त्यामुळे आता येणारे पैसे अपात्र महिलांना वगळूनच मिळतील असा अंदाज आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews