अहमदनगर आणि बीडच्या प्रवाशांसाठी एक महत्वाची अशी बातमी समोर येत आहे. हमदनगर-बीड-परळी वैजनाथ या महत्त्वाकांक्षी रेल्वे मार्गाचे दुसऱ्या टप्प्याचे काम आता पूर्ण झाले आहे. यामुळे बीड जिल्हा थेट रेल्वेने अहमदनगरला जोडला जाणार आहे. अमळनेर ते बीड या 67.78 किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले असून यामुळे बीड आणि परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
अहमदनगर-बीड रेल्वे प्रवासाला चालना
अहमदनगर ते बीड थेट रेल्वे सेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशां प्रवासाचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. या मार्गात नवीन स्थानकांचा विकास करण्यात आला असून यात जतनंदुर, विघ्नवाडी, रायमोहा, राजुरी आणि बीड यांसारख्या स्थानकांचा समावेश आहे. या स्थानकांमुळे परिसरातील गावांचा विकास होण्यासोबतच ती शहरांशी देखील जोडली जाणार आहेत. या मार्गाचे उद्घाटन लवकरच होणार आहे. येत्या 17 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मार्गाचे उद्घाटन होणार असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील. या उद्घाटन समारंभानंतर लवकरच या मार्गावर डेमो रेल्वे सेवा सुरू होणार आहे.
वाहतूक व्यवस्थेला मोठा हातभार लागणार
या रेल्वेमार्गामुळे बीडमधील मालवाहतूक सोपी होईल आणि यामुळे स्थानिक शेती, उद्योग आणि व्यापाराला मोठी आर्थिक चालना मिळण्यास मदत होईल. याशिवाय रेल्वे आणि संबंधित सेवांमुळे या भागात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. अहमदनगर ते परळी वैजनाथ या एकूण 261 किलोमीटरच्या रेल्वेमार्गाचे काम तीन टप्प्यात सुरू आहे. यातील अहमदनगर ते आष्टी हा पहिला टप्पा यापूर्वीच कार्यान्वित झाला आहे. आता दुसरा टप्पा पूर्ण झाल्यामुळे थेट अहमदनगर ते बीड असा रेल्वे प्रवास शक्य होणार आहे. यामध्ये बीड ते परळी वैजनाथ असे काम तिसऱ्या टप्प्यात केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.






