Marathi News

Fastag वापरकर्त्यांसाठी धोक्याची घंटा! बनावट ‘वार्षिक पास’च्या नावाखाली मोठी ऑनलाइन फसवणूक

Published:
वाहनधारकांना वार्षिक पास मिळवून टोलमध्ये सवलत मिळेल या आशेने अनेकजण ऑनलाइन पर्याय शोधतात. याचाचा फायदा घेत काही फसवणूक करणारे ऑनलाइन प्लॅटफॉर्म तयार करून लोकांना भुलवतात.
Fastag वापरकर्त्यांसाठी धोक्याची घंटा! बनावट ‘वार्षिक पास’च्या नावाखाली मोठी ऑनलाइन फसवणूक

Fastag फास्टॅग वापरणाऱ्या लाखो वाहनधारकांसाठी आता नवीन सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. देशभरात ई-टोलिंगच्या वापरात वाढ होत असताना सायबर गुन्हेगारांनीही फसवणुकीचे नवे मार्ग शोधले आहेत. यामध्ये सर्वाधिक वाढलेली फसवणूक म्हणजे बनावट फास्टॅग वार्षिक पास विक्रीची. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच NHAI यांनी या संदर्भात अधिकृत इशारा जारी केला आहे.

फसवणूक करणारे प्लॅटफॉर्म

वाहनधारकांना वार्षिक पास मिळवून टोलमध्ये सवलत मिळेल या आशेने अनेकजण ऑनलाइन पर्याय शोधतात. याचाचा फायदा घेत काही फसवणूक करणारे ऑनलाइन प्लॅटफॉर्म तयार करून लोकांना भुलवतात. आकर्षक ऑफर्स, एक वर्षाची वैधता आणि कमी पैसे अशा आमिषांमुळे लोक या जाळ्यात अडकतात. परंतु या लिंक किंवा वेबसाइट्स बनावट असल्याचे NHAIने स्पष्ट केले आहे. अशा ठिकाणी पैसे भरल्यास ते थेट सायबर गुन्हेगारांच्या खात्यात जातात आणि वाहनधारकाचे आर्थिक नुकसान होते. Fastag

NHAI चा इशारा

NHAIने सांगितले की फास्टॅगसाठी वार्षिक पास फक्त आणि फक्त अधिकृत राजमार्ग यात्रा मोबाईल ॲपद्वारे उपलब्ध आहे. या अधिकृत ॲपव्यतिरिक्त इतर कोणत्याही वेबसाइट, लिंक किंवा पोर्टलवरून वार्षिक पास खरेदी करणे अशक्य आहे. त्यामुळे जे प्लॅटफॉर्म स्वत:ला अधिकृत असल्याचा दावा करतात, ते प्रत्यक्षात फसवणूक करणारे आहेत. अनोळखी लिंकवर क्लिक केल्यास केवळ आर्थिक फटका बसू शकतो असे नाही, तर वाहन व वैयक्तिक माहितीही लीक होण्याची शक्यता वाढते.

X (माजी ट्विटर) वर NHAIने या संदर्भात खास पोस्ट शेअर केली. त्या पोस्टमध्ये त्यांनी नागरिकांना इशारा देताना सांगितले की बनावट वेबसाइट आणि अनधिकृत लिंकद्वारे फास्टॅग वार्षिक पास विक्री वाढली आहे. वार्षिक पास देणारी कोणतीही बाहेरील वेबसाइट अधिकृत नसल्यामुळे त्यावर विसंबू नये. तसेच, कोणासोबतही वाहन क्रमांक, FASTag ID किंवा KYC तपशील शेअर करणे टाळावे. अज्ञात लिंक, SMS किंवा ईमेलवर क्लिक करण्यापूर्वी सत्यता तपासणे आवश्यक आहे.

विशेष म्हणजे, फास्टॅगशी संबंधित फसवणुकीच्या घटना मागील काही महिन्यांत वाढल्या आहेत. लोकांना अनोळखी नंबरवरून फोन, मेसेज, लिंक पाठवून ‘KYC अपडेट करा’, ‘वार्षिक पास मिळवा’, ‘FASTag बंद होईल’ अशा बहाण्याने पैसे उकळले जातात. अनेकजण अशा घाईघाईत लिंकवर क्लिक करतात आणि त्यानंतर त्यांच्या खात्यातून पैसे काढले जातात.

तज्ज्ञांच्या मते, भविष्यात डिजिटल पेमेंट्स वाढत राहणार असल्याने अशा प्रकारच्या फसवणुकीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनधारकांनी जागरूक राहणे अत्यंत गरजेचे आहे. सुरक्षिततेसाठी फक्त अधिकृत ॲप, अधिकृत टोल प्लाझा किंवा बँकेच्या स्रोतांवरच विश्वास ठेवावा. कोणतीही लिंक संशयास्पद वाटल्यास ती तत्काळ टाळावी आणि संबंधित अधिकाऱ्यांची मदत घ्यावी.

NHAIने नागरिकांना विनंती केली आहे की फास्टॅगशी संबंधित कोणतीही माहिती खात्रीशीर स्त्रोतांमधूनच घ्यावी. अधिकृत राजमार्ग यात्रा ॲपच वार्षिक पास खरेदीसाठी मान्यताप्राप्त मार्ग आहे, याची सर्व वाहनधारकांनी नोंद घ्यावी. फसवणूक टाळण्यासाठी जागरूकता आणि सावधगिरी हीच पहिली पायरी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews