SBI एटीएम कॅश मॅनेजमेंटची जबाबदारी आता या कंपनीकडे? बँकेने कोणत्या कंपनीकडे सोपवली कमान

Published:
SBI आणि CMS यांच्यात यापूर्वीही अनेक मोठ्या प्रकल्पांवर यशस्वीपणे काम झाले आहे
SBI एटीएम कॅश मॅनेजमेंटची जबाबदारी आता या कंपनीकडे? बँकेने कोणत्या कंपनीकडे सोपवली कमान

देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या एटीएम नेटवर्कला अधिक सक्षम आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. SBI ने एटीएम कॅश मॅनेजमेंट आणि संबंधित सेवा CMS Info Systems Limited या कंपनीकडे सोपवल्या आहेत. यासाठी बँकेने कंपनीला 1,000 कोटी रुपयांचा करार दिला असून या कराराची मुदत 10 वर्षांची असेल.

या करारामध्ये 5,000 SBI एटीएमचा समावेश 

या कराराअंतर्गत CMS Info Systems देशभरातील SBIच्या सुमारे 5,000 बँक मालकीच्या एटीएमची देखरेख करणार आहे. एटीएममध्ये रोख रकमेची उपलब्धता, ऑपरेशन्सवर लक्ष ठेवणे आणि अपटाइम वाढवणे अशी जबाबदारी कंपनीकडे असेल. याचा थेट फायदा SBIच्या लाखो ग्राहकांना होणार असून एटीएममध्ये कॅश नसणे किंवा मशीन बंद असणे यासारख्या समस्यांना कमी प्रमाणात सामोरे जावे लागेल.

हा 10 वर्षांचा करार याच महिन्यापासून लागू होणार आहे. याअंतर्गत CMS मॅनेज्ड सर्व्हिसेस, कॅश एफिशियन्सीमध्ये सुधारणा आणि एटीएम ऑपरेशन्स अधिक स्थिर करण्यावर भर देण्यात येणार आहे. ग्राहकांना कोणताही अडथळा न येता सेल्फ-सर्व्हिस बँकिंग सुविधा मिळत राहावी, हा बँकेचा मुख्य उद्देश आहे.

बँकेचा पहिला मोठा डायरेक्ट कॅश आऊटसोर्सिंग करार

कंपनीच्या माहितीनुसार, सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्याही बँकेकडून देण्यात आलेला हा अशा प्रकारचा पहिला मोठा आणि थेट कॅश आऊटसोर्सिंग करार आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या एटीएम नेटवर्कचा समावेश या करारात करण्यात आला असून, बँक आऊटसोर्सिंग क्षेत्रातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

दरम्यान, CMS Info Systems चे चीफ बिझनेस ऑफिसर अनुश राघवन यांनी सांगितले की या करारामुळे कंपनीला येत्या काही वर्षांत सुमारे 500 कोटी रुपयांहून अधिक महसूलवाढीची अपेक्षा आहे. त्यांनी हेही नमूद केले की 2025 मध्ये देशातील एटीएम नेटवर्कला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता आणि त्या काळात CMS ने अनेक बँकांचे एटीएम ऑपरेशन्स स्थिर करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

SBI आणि CMS यांचा करार आधीपासूनच मजबूत

SBI आणि CMS यांच्यात यापूर्वीही अनेक मोठ्या प्रकल्पांवर यशस्वीपणे काम झाले आहे. CMS मल्टी-वेंडर सॉफ्टवेअर सोल्यूशन्स, व्हिजन एआय सोल्यूशन्स आणि एटीएम मॅनेज्ड सर्व्हिसेसच्या माध्यमातून बँकिंग क्षेत्रात आपली भक्कम उपस्थिती राखून आहे. हा नवा करार या भागीदारीला आणखी बळ देणारा ठरणार असल्याचे मानले जात आहे.

या मोठ्या ऑर्डरची माहिती समोर आल्यानंतर CMS Info Systems च्या शेअर्समध्येही तेजी पाहायला मिळाली.

Follow Us :GoogleNews