उत्तर आणि पूर्वोत्तर भारतात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने भूस्खलनाच्या घटना वाढताना दिसत आहेत. हिमालयीन पट्ट्यातील डोंगराळ भागांमध्ये अतिवृष्टी, अनियंत्रित बांधकामे आणि जंगलतोड यांमुळे जमिनीची पकड सैल होत आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये रस्ते कोसळणे, घरांचे नुकसान आणि जीवितहानीसारख्या घटना वारंवार घडत आहेत. पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात देखील अशीच एक भुस्खलनाची धक्कादायक घटना घडली आहे, ज्यामध्ये अनेक नागरिकांनी जीव गमावल्याची माहिती समोर येत आहे.
दार्जिलिंग जिल्ह्यात भुस्खलन; 17 जणांचा मृत्यू
पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे. ज्यामध्ये आतापर्यंत किमान 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. दार्जिलिंगमधील भूस्खलनामुळे अनेक घरे कोसळली आहेत आणि प्रमुख रस्ते खराब झाले आहेत. अनेक दुर्गम गावांचा संपर्क पूर्णपणे तुटल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांची संख्या वाढू शकते, कारण अनेक भागात शोध आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे. उत्तर बंगाल विकास मंत्री उदयन गुहा यांनी परिस्थिती चिंताजनक असल्याचे वर्णन केले. त्यांनी सांगितले की स्थानिक अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. एएफपीच्या वृत्तानुसार, 20 जणांचा मृत्यू झाला आहे.
युध्दपातळीवर बचावकार्य; नागरिकांना सतर्कतेच्या सूचना
भूस्खलनामुळे मिरिक-सुखियापोखरी रस्त्यासह अनेक पर्वतीय रस्त्यांवरील वाहनांची वाहतूक ठप्प झाली आहे आणि उंचावरील ठिकाणांशी संपर्क तुटला आहे. अनेक गावे पूर्णपणे वेगळी झाली आहेत. परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. मिरिकमध्ये 11 आणि दार्जिलिंगमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. सततच्या पावसामुळे मदत आणि बचाव कार्यात अडथळा येत आहे. हा परिसर अत्यंत निसरडा आहे आणि अनेक घरे कोसळली आहेत. दार्जिलिंगच्या सरसाली, जसबीरगाव, मिरिक बस्ती, धार गाव (मेची) आणि मिरिक तलाव परिसरात भूस्खलनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.






