वॉशिंग्टन डीसी- मायक्रोसॉफ्टच्या वॉशिंग्टनमधील कार्यालयात आंदोलन करणाऱ्या 18 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. नो यूजर फॉर अपार्थाईड ग्रुपशी हे आंदोलक संबंधित आहेत. इस्रायलसोबत मायक्रोसॉफ्टनं केलेल्या क्लाऊड कराराच्या विरोधात आंदोलकांनी कार्यालयाच्या आत येऊन निदर्शनं केली.
आंदोलकांनी कंपनीच्या लोगोवर लाल रंग ओतला आणि घोषणाबाजी केली. आंदोलनानंतर कार्यालयातून बाहेर जाण्यासही त्यांनी नकार दिला. त्यामुळं या 18 जणांना अटक करण्याची वेळ आली.
नेमका का आहे विरोध?
मायक्रोसॉफ्ट आणि गुगलनं 2021 साली इस्रायल सरकारसोबत सुमारे 1.2 अब्ज डॉलर्सची क्लाऊड सर्व्हिस डील केलेली आहे. या प्रोजेक्टला प्रोजेक्ट निंबस असं नाव देण्यात आलंय. या करारामुळे मायक्रोसॉफ्टचे अनेक कर्मचारी नाराज आहेत. या तंत्रज्ञानाचा वार सैन्याच्या कारवायांवर निरीक्षणासाठी होऊ शकतो, असा त्यांचा आक्षेप आहे. गाझा सारख्या वादाच्या क्षेत्रात या तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येतेय.
तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर नाही- मायक्रोसॉफ्ट
या आरोपांची गंभीरता लक्षात घेता, याची चौकशी करण्यासाठी एका लॉ फर्मला चौकशीसाठी नियुक्त करण्यात आलं आहे. असं मायक्रोसॉफ्टच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय. या तंत्रज्ञानाचा गाझामध्ये नागरिकांच्या विरोधात दुरुपयोग करण्यात आलेला नाही, असा दावाही करण्यात आलाय.
मानवाधिकारांचं उल्लंघन करणाऱ्या किंवा मानकं मोडणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर रोखू असंही मायक्रोसॉफ्टनं स्पष्ट केलंय. मात्र इस्रायलसोबतची सर्व करार रद्द करण्यात यावेत अशी मागणी आंदोलकांची आहे. या तंत्रज्ञानाचा वापर पॅलेस्टिनींच्या विरोधात असल्याचा आंदोलकांचा दावा आहे.
यापूर्वी भारतीय वंशाच्या कर्मचाऱ्याला कंपनीनं काढलं
यापूर्वी एप्रिलमध्ये मायक्रोसॉफ्टच्या 50 व्या स्थआपना दिवशी विरोधी आंदोलन करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना कंपनीनं नोकरीवरुन काढून टाकलं. यात भारतीय वंशाच्या सॉफ्टवेअर इंजिनीअर वानिया अग्रवाल हिचाही समावेश होता. इस्रायली सैन्याला एआय तंत्रज्ञान विकून कंपनी नरसंहारात सामील होत असल्याचा आरोप या दोन्ही कर्मचाऱ्यांनी केला होता.
मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला, बिल गेट्स आणि स्टीव वॉल्मर यांच्या सेशनच्या वेळी इब्तिहाल अबूसाद आणि वानिया अग्रवाल यांनी विरोधी आंदोलन केलं होतं. मायक्रोसॉफ्ट इस्रायलला एआय हत्यारं विकत असून यातून 50 हजार जणं मारले गेल्याचा आरोप यावेळी इब्तिहाल यानं केला होता.





