आठव्या वेतन आयोगाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी? सरकारी कर्मचाऱ्यांना किती फायदा होणार?

Written by:Rohit Shinde
Published:
आठव्या वेतन आयोगाचा अहवाल 2025 अखेरीस सरकारपुढे सादर होण्याची शक्यता असून, ते 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्याची तयारी केंद्र सरकार करत आहे.
आठव्या वेतन आयोगाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी? सरकारी कर्मचाऱ्यांना किती फायदा होणार?

8 वा वेतन आयोग सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या आयोगाच्या शिफारसीनुसार केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते आणि निवृत्तीवेतन यामध्ये सुधारणा केली जाते. महागाई वाढत असताना कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षितता देणे, त्यांच्या जीवनमानात सुधारणा करणे हे मुख्य उद्दिष्ट असते. यंदा सुरुवातीला वेतन आयोगाची स्थापना जाहीर झाली असली तरी, त्याची शिफारस प्रक्रिया अद्याप सुरूच आहे. आठव्या वेतन आयोगाचा अहवाल 2025 अखेरीस सरकारपुढे सादर होण्याची शक्यता असून, ते 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्याची तयारी केंद्र सरकार करत आहे.

प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार ?

देशातील सुमारे 44 लाख सरकारी कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारक यांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. या वर्षाच्या सुरुवातीला केंद्रीय मंत्रिमंडळाने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली. त्याअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शन यामध्ये लक्षणीय सुधारणा केली जाणार आहे. तथापि, आर्थिक आणि प्रशासकीय प्रक्रियेतील वेळ आणि विलंब लक्षात घेता, प्रत्यक्ष अंमलबजावणी एप्रिल 2026 नंतर होण्याची शक्यता अनेक तज्ज्ञ वर्तवतात. सरकारच्या आर्थिक स्थितीचा आणि महागाई दराचा प्रभाव महत्त्वाचा ठरणार आहे. त्यानुसारच अंमलबजावणीचे गणित ठरेल. फक्त पगारच नव्हे, तर भत्ते, बोनस, सुविधा यांचाही आढावा वेतन आयोग घेतो. आयोगाकडून सादर होणाऱ्या शिफारसींनंतर, त्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीला पाठवण्यात येतात आणि त्यानंतरच अंतिम अंमलबजावणी होते.

8व्या वेतन आयोगामुळे अपेक्षित बदल 

आठवा वेतन आयोग लागू केल्यानंतर केंद्र सरकारच्या खर्चात सुमारे 1.80 लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडण्याचा अंदाज आहे. यानुसार, कर्मचाऱ्यांच्या वेतनात आणि पेन्शनमध्ये 30 ते 34 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. फिटमेंट फॅक्टरनुसार पगार, पेन्शन आणि भत्ते वाढतील. तज्ञांच्या मते, Fitment Factor हा 1.83 ते 2.46 दरम्यान असू शकतो, जो वेतन गणनेसाठी एक प्रमुख आधार असतो. यामध्ये बदल झाल्यास पगारवाढीवर थेट परिणाम होईल.

वेतन आयोगाचे महत्व आणि इतिहास

भारतात दर १० वर्षांनी वेतन आयोगाची निर्मिती केली जाते. भारतात पहिल्यांदा 1946 साली वेतन आयोगाची स्थापना झाली होती. त्यानंतर दर 10 वर्षांनी वेतन आयोग नेमण्याची परंपरा आहे. मागील सातवा वेतन आयोग जानेवारी 2016 पासून लागू करण्यात आला होता. वेतन आयोगामुळे होणाऱ्या बदलांमुळे कर्मचारी वर्गात समाधान आणि उत्पादकता वाढते. 8वा वेतन आयोग केव्हा लागू होणार याकडे लाखो कर्मचारी लक्ष ठेवून आहेत. वेतन वाढल्याने खाजगी क्षेत्रातही वेतनवाढीचा दबाव निर्माण होतो. त्यामुळे हा आयोग केवळ सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच नव्हे तर एकूणच अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा ठरतो. आयोगाच्या अंमलबजावणीमुळे बाजारात खर्चवाढ होऊन आर्थिक व्यवहारांना चालना मिळते.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews