Marathi News

अमेरिकेचा पाकिस्तानला मोठा झटका; टीआरएफ दहशतवादी संघटना म्हणून घोषित, पहलगाम हल्ल्याशी संघटनेचे कनेक्शन

Written by:Rohit Shinde
Published:
अमेरिकेन सरकारने पाकिस्तानमधील द रेझिस्टन्स फ्रंटला या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. ही संघटना जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याबाबत दोषी आहे.
अमेरिकेचा पाकिस्तानला मोठा झटका; टीआरएफ दहशतवादी संघटना म्हणून घोषित, पहलगाम हल्ल्याशी संघटनेचे कनेक्शन

अमेरिकेने पाकिस्तानला मोठा झटका दिला आहे. अमेरिकेन सरकारने पाकिस्तानमधील द रेझिस्टन्स फ्रंट अर्थात टीआरएफला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. ही संघटना जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याबाबत दोषी आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी ही माहिती दिली. त्यामुळे यानिमित्ताने पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगलाच झटका बसला आहे.

टीआरफ संघटना पहलगाम हल्ल्याला जबाबदार

टीआरएफने या वर्षी २२ एप्रिल रोजी पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची गोळ्या घालून हत्या केली होती. द रेझिस्टन्स फ्रंट ही पाकिस्तानातील दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबाची एक आघाडी संघटना आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी या दहशतवादी संघटनेचे वर्णन लष्कर-ए-तैयबाची आघाडी म्हणून केले. लष्कर-ए-तैयबावर संयुक्त राष्ट्राने यापूर्वीच बंदी घातली आहे. या दहशतवादी संघटनेचे मुख्यालय पाकिस्तानमध्ये आहे. अमेरिकेचे या निर्णयामुळे दहशतवादविरोधी प्रयत्नांमध्ये भारतासोबत अमेरिकेचे संबंध अधिक दृढ होतील.

दहशतवाद समूळ नष्ट करण्यासाठी अमेरिकेचे पाऊल

टीआरएफला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करणे हे ट्रम्प प्रशासनाच्या राष्ट्रीय सुरक्षा हितांचे रक्षण करण्यासाठी, दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी आणि पहलगाम हल्ल्यासाठी न्याय मिळवण्याच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. या दहशतवादी गटाचा भारतीय सुरक्षा दलांवर होणाऱ्या अनेक हल्ल्यांशीही संबंध आहे. २००८ मध्ये लष्कर-ए-तैयबाने केलेल्या मुंबई हल्ल्यानंतर भारतातील नागरिकांवर सर्वात घातक हा दहशतवादी हल्ला झाला.

अमेरिकेने टीआरएफला परदेशी दहशतवादी संघटना म्हणून नियुक्त केल्याने त्याच्या सदस्यांवर कठोर आर्थिक निर्बंध लादले जातील. या संघटनेवर बंदी घालताना अमेरिकेने म्हटले आहे की, दहशतवादाविरुद्धच्या लढाईत अमेरिका भारतासोबत उभी आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, या भ्याड हल्ल्यातील गुन्हेगारांना आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भारत कटिबद्ध आहे. त्यानंतर भारतीय सेनेने ऑपरेशन सिंदूर राबवले होते.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews