Marathi News

अमेरिकेचा भारतावर ‘दुगना लगान’, डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफला पंतप्रधान मोदींचं काय उत्तर?

Written by:Smita Gangurde
Published:
या निर्णयाविरोधात भारतानं घेतलेल्या ठाम भूमिकेला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही पाठिंबा दिलाय. अमेरिका आर्थिक ब्लॅकमेलिंग करत असून, भारतानं अमेरिकेपुढं झुकू नये, असं ट्विट राहुल गांधींनी केलंय.
अमेरिकेचा भारतावर ‘दुगना लगान’, डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफला पंतप्रधान मोदींचं काय उत्तर?

नवी दिल्ली- रशिया-यूक्रेनमधलं अजूनही न संपलेलं युद्ध आणि पाकिस्तानची जिरवण्यासाठी भारतानं राबवलेलं ऑपरेशन सिंदूर यामुळं भारत आणि अमेरिका संबंधांत मोठी दरी निर्माण झालीय. आधी भारताला दम भरत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २५ टक्के टॅरिफ लादलं. तरीही भारत ऐकत नाही हे पाहिल्यावर त्यांनी आणखी २५ टक्के असा ५० टक्के दुगना टॅरिफ लावला.

पण, भारतानं ट्रम्प यांच्या मनमानीला ‘अन्यायकारक, दुर्दैवी आणि तर्कहीन’ असं म्हटलंय. तसंच या निर्णयापुढे न झुकण्याचा निर्णय भारतानं घेतलाय. ट्रम्प यांच्या टॅरिफवाढीच्या निर्णयानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांना तसंच उत्तर दिलं.

पंतप्रधान मोदींचं काय प्रत्युत्तर?

शेतकरी, मच्छीमार आणि दूध व्यवसायातील शेतकऱ्यांचं हित हे आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य आहे. भारत त्यांच्या हिताशी कोणतीही तडजोड करणार नाही. त्याची मोठी किंमत मोजावी लागेल, पण त्यासाठी मी तयार आहे. शेतकरी आणि मच्छीमारांसाठी भारत तयार आहेअशा शब्दांत त्यांनी थेट नाव न घेता, नरेंद्र मोदींनी अमेरिकेला सुनावलं.

डोनाल्ड ट्रम्प भारतावर का भडकले?

रशियाकडून तेल खरेदी करून भारत युक्रेनविरोधी युद्धाला मदत करतोय, असं अमेरिकेचं म्हणणं आहे. अमेरिकेनं इशारा देऊनही भारताने रशियासोबतचे व्यापारी संबंध तोडले नाहीत. अमेरिका आणि युरोपीय युनियन रशियाकडून वस्तू खरेदी करतात, मग आम्ही तेल खरेदी का करू नये? असा सवाल परराष्ट्र मंत्रालयानं उपस्थित केला. भारत-पाक शस्त्रसंधीचं श्रेय भारतानं कधीच ट्रम्प यांना दिलं नाही
पाकिस्तानसह अनेक देशांनी डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस केली. पण भारतानं काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळं भडकलेल्या ट्रम्पतात्यांनी ५० टक्के टॅरिफचा बॉम्ब टाकला.

सत्ताधारी-विरोधकांची एकजूट

या निर्णयाविरोधात भारतानं घेतलेल्या ठाम भूमिकेला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही पाठिंबा दिलाय. अमेरिका आर्थिक ब्लॅकमेलिंग करत असून, भारतानं अमेरिकेपुढं झुकू नये, असं ट्विट राहुल गांधींनी केलंय.

अमेरिकेनं भारतावर दादागिरी करण्याची ही काही पहिली वेळ नाही. मात्र अमेरिकेच्या दबावापुढं भारत कधीच झुकला नाही, हा इतिहास आहे. रशिया आणि अमेरिकेच्या साठमारीत, कायम भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याचं दिसतंय. पण स्वदेशीची ताकद माहिती असलेल्या भारतानं, या असल्या दबावापुढं कधीच नांगी टाकलेली नाही. यावेळीही याच इतिहासाची पुनुरावृत्ती होईल, यावर प्रत्येक भारतीयाला ठाम विश्वास आहे.

Follow Us :GoogleNews