Marathi News

आंध्रप्रदेशचे सरकार ‘या’ आयटी कंपनीला 99 पैशांत देणार जमीन; गुंतवणूक वाढविण्यासाठी निर्णय

Written by:Rohit Shinde
Published:
आंध्रप्रदेश सरकार गुंतवणूक वाढविण्यासाठी नेहमीचं मोठी पाऊले उचलत असते. आता एका कंपनीला सरकार 99 पैशांत जमीनीचा मोठा भूखंड देणार आहे.
आंध्रप्रदेशचे सरकार ‘या’ आयटी कंपनीला 99 पैशांत देणार जमीन; गुंतवणूक वाढविण्यासाठी निर्णय

Cognizant ही अमेरिकेतील न्यू जर्सी येथे मुख्यालय असलेली आयटी कंपनी असून, विशाखापट्टणम येथे येत्या 8 वर्षांत 1,582 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. कंपनी येथे एक भव्य आयटी कॅम्पस उभारणार असून, त्यामुळे सुमारे 8,000 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. यासाठी आंध्र प्रदेश सरकार कंपनीला अवघ्या 99 पैशांत जमीन देत आहे, सरकार गुंतवणूक वाढविण्यासाठी अनेक पाऊले उचलताना दिसत आहे.

सरकारचे गुंतवणूकीसाठी महत्वपूर्ण पाऊल

आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारने आयटी क्षेत्रात मोठी पावले उचलायला सुरुवात केली आहे. नुकताच सरकारने आंतरराष्ट्रीय आयटी कंपनी Cognizant सोबत एक महत्त्वाचा करार केला असून, कंपनीला फक्त 99 पैशांमध्ये जमिनीचा मोठा भूखंड देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, याआधी एप्रिल 2025 मध्ये TCS ला देखील 21 एकर जमीन 99 पैशांमध्ये दिली गेली होती.

कंपनीचे हे कॅम्पस भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या आयटी हब हैदराबादपासून 600 किमी आणि चेन्नईपासून 800 किमी अंतरावर असेल. कंपनी मार्च 2029 पर्यंत व्यावसायिक कामकाज सुरू करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

विशाखपट्टणमला आयटी हब करण्याचा मानस

याआधी एप्रिल महिन्यात TCS ला आयटी हिल क्रमांक 3 मध्ये 21.16 एकर जमीन 99 पैशांच्या टोकन भाडेपट्ट्यावर देण्यात आली होती. कंपनीने या ठिकाणी 1370 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले असून, 12,000 रोजगारांची संधी निर्माण होणार आहे. राज्याचे आयटी मंत्री नारा लोकेश यांनी सांगितले होते की, “विशाखापट्टणमला नवा आयटी हब बनवण्याचा सरकारचा स्पष्ट उद्देश आहे.”

COGNIZANTचे नेमकं काय कार्य?

कॉग्निझंट (Cognizant) ही एक आंतरराष्ट्रीय आयटी सेवा आणि सल्लागार कंपनी आहे. तिचे मुख्यालय अमेरिकेतील न्यू जर्सी येथे आहे. ही कंपनी विविध कंपन्यांना माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित सेवा पुरवते, जसे की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, डेटा अ‍ॅनालिटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्लाउड सेवा, सायबर सुरक्षा आणि बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग (BPO). कॉग्निझंट विविध उद्योग क्षेत्रांना – जसे की बँकिंग, हेल्थकेअर, विमा, उत्पादन, रिटेल – डिजिटल उपाययोजना देण्याचे काम करते. भारतात कंपनीचे अनेक केंद्रे आहेत, जिथे हजारो कर्मचारी काम करतात. कॉग्निझंटचा मुख्य उद्देश म्हणजे ग्राहक कंपन्यांना त्यांच्या व्यवसायात तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिक कार्यक्षम बनवणे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews