बोस्टन – टेक कंपनी एस्ट्रोनॉमरनं सीईओ एंडी बायरन यांना दीर्घ सुट्टीवर पाठवलं आहे. कंपनीची एचआर हेड क्रिस्टीन कॅबोटसोबत कोल्ड प्ले कन्सर्टमध्ये रोमान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आलीय.
एंडी बायरन यांच्या जागी कंपनीचे सहसंस्थापक आणि चीफ प्रमोटर ऑफिसर पीट डेजॉय यांना हंगामी सीईओ म्हणून नियुक्त करण्यात आलंय. या प्रकरणी कंपनीनं सीईओ आणि एचआर हेड यांच्यातील अफेअर्सची चौकशी सुरू केली आहे. कंपनीनं त्यांच्या एक्स हँडलवर याबाबतची माहिती शेअर केली आहे. कंपनीचं नेतृत्व करणाऱ्यांकडून चांगलं आचरण आणि जबाबदारी अपेक्षित असल्याचं न्यूयॉर्कस्थित कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलंय.
एस्ट्रोनॉमर कंपनी काय आहे आणि काय करते?
एस्ट्रोनॉमर एक तंत्रज्ञानाशी संबंधित कंपनी आहे. अपाचे एयरफ्लोवर बेस्ड डेटा ऑर्केस्टेशन प्लॅटफॉर्म म्हणून ही कंपनी काम करते. अनेक संस्थांच्या डेटा प्रोसेसिंग, वर्कफ्लो मॅनेजमेंट आणि डेटा एनालिटिक्सच्या कामात कंपनीकडून मदत केली जाते.
काय आहे नेमकं प्रकरण?
18 जुलै रोजी बोस्टनमध्ये प्रसिद्ध रॉक बँड कोल्ड प्ले यांची कॉन्सर्ट होती. यात एस्ट्रोनॉमर कंपनीचे सीईओ एंडी बायरन आणि पीफ पिपल ऑफिसर क्रिस्टिन कॅबोट यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओत ते एकमेकांसोबत लगट करत असल्याचं दिसत होतं.
बँडचा फ्रंटमॅन क्रिस मार्टिननं आपल्या परफॉर्मन्समध्ये किस कॅम हा लोकप्रिय सेगमेंट सुरु केला. यात कॅमेरा गर्दीत असलेल्या जोडप्यांवर फोकस करतो. कॅमेरा जसाही बायरन आणि क्रिस्टिना यांच्यावर गेला त्यावेळी ते एकमेकांच्या मिठीत असल्याचं दिसलं.
स्क्रीनवर या दोघांचे चेहरे आल्यानंतर दोघांनीही तोंड लपवण्याचा प्रयत्न केला. क्रिस मार्टिननं अरे या दोघांना बघा, या दोघांचं अफेअर आहे किंवा ते लाजले, अशी कॉमेंटही केली होती.
ही तर पत्नीची फसवणूक
कॉन्सर्टच्या नंतर लगेच या दोघांचा हा व्हिडीओ टिकटॉक, रेडिट आणि एक्स सारख्या सोशल मीडियावर व्हायरल झाला. अनेक युझर्सनी हे चिटिंग स्कँडल असल्याचं यावर लिहिलं. एंडी बायरन हे विवाहित असून त्यांना दोन मुलं असताना हा प्रकार समोर आल्यानं एकच खळबळ उडाली. अनेकांनी या दोघांचं कृत्य बेजबाबदार असल्याच्याही प्रतिक्रिया दिल्या.





