बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर; 6 आणि 11 नोब्हेंरला 2 टप्प्यांत मतदान, निकाल कधी लागणार?

Written by:Rohit Shinde
Published:
Last Updated:
बहुप्रतिक्षीत अशा बिहार विधानसभा निवडणुकांची अखेर घोषणा करण्यात आली आहे. 2 टप्प्यांत मतदान होणार आहे. त्यामुळे बिहारमध्ये नितीश कुमारांचे सरकार टीकणार की आणखी कुणाला संधी मिळणार, याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर; 6 आणि 11 नोब्हेंरला 2 टप्प्यांत मतदान, निकाल कधी लागणार?

अवघ्या देशात गेल्या काही महिन्यांपासून बिहार विधानसभेच्या निवडणुकांची चर्चा सुरू होती. त्याबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. अवघ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या बिहार निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख ज्ञानेश कुमार यांनी बिहारच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. बिहारच्या निवडणुका या दोन टप्प्यात होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान हे 6 नोव्हेंबर रोजी, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान हे 11 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 14 नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे आता बिहारमध्ये नेमके कुणाचे सरकार येणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

बिहार विधानसभा निवडणूक घोषित

मतदार यादीतील घोळ, मतचोरीचे गंभीर आरोप, राज्य सरकारनं जाहीर केलेल्या अनेक योजना, महिलांच्या बँक खात्यांमध्ये थेट जमा करण्यात आलेले पैसे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. बिहारमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान होईल. ६ आणि ११ नोव्हेंबरला मतदान घेतलं जाईल. १४ नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल.

सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षातील राष्ट्रीय जनता दल यांनी दोन टप्प्यांमध्ये निवडणूक घेण्याची मागणी केली होती. विशेष म्हणजे भाजप हा सत्तेतला, तर राजद हा विरोधी बाकांवरील सर्वात मोठा पक्ष आहे. भाजप आणि राजदचे ७० पेक्षा अधिक आमदार विधानसभेत आहेत. दोन्ही बड्या पक्षांनी केलेली मागणी निवडणूक आयोगानं मान्य केली आहे.

राज्यात एकूण ७.४३ कोटी मतदार आहेत. यामधील ३.९२ पुरुष आणि ३.५० कोटी महिला मतदार आहेत. ७.२ लाख दिव्यांग मतदार आहेत. राज्यातील तरुण मतदारांचा (२० ते २९ वर्षे) १.६३ कोटींच्या घरात आहे. तर पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांची संख्या १४.०१ लाख इतकी आहे.

बिहारमध्ये नेमकी कुणाची सत्ता येईल?

बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत नेमकी सत्ता कोणाच्या हातात येईल हे आजच्या घडीला ठरवता येणे कठीण आहे. सध्याचे अंदाज आणि मतदारांच्या प्रवृत्तीवरून वेगवेगळ्या पक्षांची शक्यता दिसून येते, जसे की राजद, जेडीयू, भाजपा आणि काँग्रेस यांच्यातील सत्ता स्पर्धा. निवडणुकीच्या निकालावर अनेक घटक प्रभाव टाकतात. स्थानिक मुद्दे, उमेदवारांची लोकप्रियता, जातीय-समूहीय समीकरण, आणि राष्ट्रीय व राज्यस्तरीय धोरणे. अंतिम निकाल १४ नोव्हेंबरला जाहीर होईल आणि त्यानंतरच स्पष्ट होईल की बिहारमध्ये कोणत्या पक्षाची किंवा गटाची सत्ता स्थापली जाईल. मात्र एकूणच महागठबंधन (आरजेडी, काँग्रेस +) आणि एनडीएमध्ये या निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews