Marathi News

धरणं बनवाल तर क्षेपणास्त्रांनी उडवू, पाकचे लष्करप्रमुख पुन्हा बरळले, अमेरिकेच्या भूमीवरून भारताला धमकी

Written by:Smita Gangurde
Published:
अमेरिकेत जाऊन फुशारक्या मारणाऱ्या मुनीर यांना भारतानं फटकारलं.अणुहल्ल्याची धमकी देणं ही पाकिस्तानची सवयच आहे असं सांगत भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं मुनीर यांना आरसा दाखवला आहे.
धरणं बनवाल तर क्षेपणास्त्रांनी उडवू, पाकचे लष्करप्रमुख पुन्हा बरळले, अमेरिकेच्या भूमीवरून भारताला धमकी

वॉशिंग्टन डीसी- गेल्या दोन महिन्यात दुसऱ्यांदा अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले पाकचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी पुन्हा भारताला धमकी दिली आहे. यापूर्वी जून महिन्यात ऑपरेशन सिंदूरच्या वेळी असीम मुनीर थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीसाठी पोहोचले होते.

याही वेळी ते एका लष्करी कार्यक्रमासाठी उपस्थित होते. युनायटेड स्टेट्स सेंट्रल कमांडला त्यांनी भेट दिली.यावेळी मुनीर यांनी गरळ ओकत भारताला पुन्हा अणुयुद्धाची धमकी दिलेय.

काय म्हणाले असीम मुनीर?

जर इस्लामाबादला भारतामुळे धोका वाटला तर आम्ही अर्धं जग आमच्यासोबत घेऊन बुडण्याची तयारी ठेवतो. आम्ही अणुसंपन्न राष्ट्र आहोत हे लक्षात ठेवावं. सिंधू नदी ही भारताची जहागीर नाही. भारतानं नदीवर धरण बांधण्याची आम्ही वाटच पाहतोय. तो बांधला की आम्ही क्षेपणास्त्रांनी तो उडवून देऊ. आमच्याकडे क्षेपणास्त्रांची अजिबात कमतरता नाही.

या दौऱ्यातही असीम मुनीर अमेरिकेचे गोडवे गायला विसरले नाहीत. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले आहेत. त्यांच्या रणनीतीमुळे भारत-पाक युद्ध टळल्याचं मुनीर यांनी सांगत ट्रम्प यांचं कैतुक केलंय.

मुनीर यांना भारतानं फटकारलं

अमेरिकेत जाऊन फुशारक्या मारणाऱ्या मुनीर यांना भारतानं फटकारलं.अणुहल्ल्याची धमकी देणं ही पाकिस्तानची सवयच आहे असं सांगत भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं मुनीर यांना आरसा दाखवला आहे.

पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी अमेरिका दौऱ्यात दिलेल्या एका वक्तव्याकडे आमचं लक्ष गेलं. अण्वस्त्राची धमकी देणं पाकिस्तानची जुनी खोड आहे. पाकिस्तानच्या या बेजबाबदार वक्तव्यावरून आंतरराष्ट्रीय समुदाय योग्य तो निष्कर्ष काढू शकतो. पाकिस्तान केवळ एका भागापुरताच नव्हे तर जागतिक सुरक्षेसाठीही धोका आहे. मुनीर यांनी हे वक्तव्य एका मित्रराष्ट्राच्या भूमीवरून केलं हेदेखील खेदजनक असल्याचं सांगत भारताने अमेरिकेलाही याची जाणीव करून दिलीय.

अमेरिकेला पाकिस्तानची भूमिका मान्य?

मुनीर भारताबाबत बोलताना कायमच गरळ ओकतात, त्यामुळे त्यांना गांभीर्यानं घ्यायची गरज नाही.पण यावेळी त्यांनी अमेरिकेच्या भूमीवरून भारताला धमकी दिलेय.यावर अमेरिका काय भूमिका घेणार, की नेहमीसारखी पाकची दाढी कुरवाळत बसणार हे पाहावं लागणार आहे.

Follow Us :GoogleNews