Marathi News

अमेरिकेत जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या 70 टक्क्यांनी घटली, ट्रम्प सरकारच्या धोरणामुळे गोंधळ

Written by:Smita Gangurde
Published:
अमेरिकेन प्रशासनानं व्हिसा स्लॉट लवकर ओपन केले नाहीत तर अनेक विद्यार्थ्यांचं अमेरिकेत जाऊन उच्च शिक्षणाचं स्वप्न अपूर्ण राहणार आहे.
अमेरिकेत जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या 70 टक्क्यांनी घटली, ट्रम्प सरकारच्या धोरणामुळे गोंधळ

नवी दिल्ली – अमेरिकेत उच्चशिक्षणाला जाण्याची परंपरा गेल्या काही काळात देशात सुरू झाली आहे. समाजातही त्याला प्रतिष्ठा आहे. मात्र यावर्षी अमेरिकेत शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत सुमारे 70 टक्क्यांनी घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचा व्हिसा नाकारण्याचे किंवा रोखण्याचे प्रकार ट्रम्प प्रशासनाकडून होत असल्यानं विद्यार्थी गोंधळात आहेत.

साधारण जुन-जुलै या महिन्यात दरवर्षी विद्यार्थ्यांचे व्हिसाचे इंटरव्ह्यू पूर्ण झालेले असतात. अमेरिकेला जाण्याची तयारीही सुरु झालेली असते. यावर्षी मात्र व्हिसाचे स्लॉट अद्याप ओपन झालेले नसल्याची माहिती समोर येतेय. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना व्हिसा स्लॉट सुरू करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र अद्याप याबाबत स्पष्टता नाहीये. त्यामुळे वर्ष वाया जाण्याची  भीती विद्यार्थ्यांना वाटतेय.

अमेरिकेत एकूण 29 टक्के भारतीय विद्यार्थी

अमेरिकेत शिक्षणासाठी जगभरातून सुमारे 11.26 लाख विद्यार्थी दरवर्षी येतात, त्यातील 3.31 लाखांच्या आसपास संख्या ही भारतीय विद्यार्थ्यांची असते. अमेरिकेचं धोरण स्पष्ट नसल्यामुळे आता विद्यार्थी इतर देशांच्या  पर्यायांचा विचार करताना दिसतायेत. अमेरिकेत जाण्याची संधी मिळत नसेल तर इतर देशात प्रवेश घ्यावेत अशी विद्यार्थ्यांची मानसिकता आहे.

अनेक विद्यार्थ्यांची स्वप्न भंगणार

अमेरिकेन प्रशासनानं व्हिसा स्लॉट लवकर ओपन केले नाहीत तर अनेक विद्यार्थ्यांचं अमेरिकेत जाऊन उच्च शिक्षणाचं स्वप्न अपूर्ण राहणार आहे. अनेक चिंताग्रस्त विद्यार्थी आणि पालक याबाबत फोन करुन विचारणा करताना दिसतायेत. मार्चमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यांच्यापैकी अनेकांना व्हिसा इंटरव्ह्यूमध्ये नकार मिळालेले आहेत. साधारणपणे अमेरिकेत जाण्यासाठी विद्यार्थी व्हिसा सहज मिळत असे. यावेळी मात्र व्हिसा नाकारण्याचे प्रकार वाढले असल्याचं सांगण्यात येतंय.

अमेरिकन सरकारच्या कायद्यातील 214 बी कलमाचा परिणाम

सेक्शन 214 बी हा अमेरिकन कायदा स्थलांतरितांबाबतचा आहे. अर्जदाराने जर शिक्षण संपल्यानंतर भारतात परतण्याची हमी दिली नाही किंवा हे सिद्ध करु शकला नाही तर हे कलम लागू करण्यात येतं.

ही प्रक्रिया नवीन नाही तर जुनीच आहे, असं अमेरिकेतील तज्ज्ञ मंडळी सांगतायेत. मात्र ट्रम्प सत्तेत आल्यापासून हे नियम कठोर करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. दुसरीकडे व्हिसा इंटर्व्यूचे  स्लॉट्स खुले झाले आहेत, विद्यार्थअयांनी दुतावासाच्या वेबसाईटवर अपॉईंटमेंटचे मेल चेक करावेत, असं हैदराबादच्या अमेरिकन दुतावासाकडून सांगण्यात येतंय.

दोन महिन्यांपूर्वी परदेशी विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू बंद

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी दोन महिन्यांपूर्वी अमेरिकेत येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या  इंटरव्ह्यूवर बंदी घातली होती. अमेरिकेतील विद्यापीठांत ज्यूविरोधी आणि डाव्या विचारांच्या  विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं.

Follow Us :GoogleNews