मलेरियावर प्रभावी ठरणार भारतात बनलेली पहिली स्वदेशी लस? डासांपासून संसर्ग रोखण्यात सक्षम लसीची निर्मिती

Written by:Rohit Shinde
Published:
मलेरिया प्रतिबंधात भारताने एक मोठे यश मिळवले आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) देशातील पहिली स्वदेशी मलेरिया लस विकसित केली आहे.
मलेरियावर प्रभावी ठरणार भारतात बनलेली पहिली स्वदेशी लस? डासांपासून संसर्ग रोखण्यात सक्षम लसीची निर्मिती

भारताने अलीकडच्या काळात मेडिकल संशोधनात मोठी प्रगती केली आहे. मलेरिया रोखण्यासाठी भारताने पहिल्यांदाच स्वदेशी लस बनवण्यात यश मिळवले आहे. या लसीला AdFalciVax असे नाव देण्यात आले आहे. ही लस मलेरिया तसेच डासांमुळे होणाऱ्या संसर्गापासून संरक्षण देईल. स्वदेशी तंत्रज्ञानाने बनवलेली ही लस आरोग्य क्षेत्रातील एक मोठी उपलब्धी मानली जात आहे. मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनियामुळे अनेक लोक जीव गमावत असतात. अशा परिस्थितीत या स्वदेशी लसीमुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

मलेरियावर पहिली स्वदेशी लस विकसित

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने अर्थात आयसीएमआरने देशातील पहिली स्वदेशी मलेरिया लस विकसित केली आहे. या लसीला AdFalciVax असे नाव देण्यात आले आहे. ही लस केवळ मानवांना संसर्गापासून वाचवणार नाही तर मलेरियाचा प्रसार देखील कमी करण्यास उपयुक्त ठरणार आहे. भारताची ही नवीन लस मलेरिया निर्मूलनासाठी एक मोठी आशा म्हणून उदयास आली आहे. सर्व काही व्यवस्थित झाले तर येत्या काही वर्षांत देश मलेरियापासून मुक्त होऊ शकेल अशी आशा यानिमित्ताने व्यक्त होत आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आपले भुवनेश्वर येथील प्रादेशिक वैद्यकीय संशोधन केंद्र आणि राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था यांच्या माध्यमातून जैवतंत्रज्ञान विभाग-राष्ट्रीय रोगप्रतिकारक शक्ती संस्था यांच्या सोबत मिळून AdFalciVax नावाची मलेरिया लस विकसित करत आहे.

लस बाजारात येण्यास 7 वर्षे लागणार?

समोर येणाऱ्या माहितीनुसार ही लस सध्या चाचणीच्या पूर्व-क्लिनिकल टप्प्यात आहे, परंतु त्याचे निकाल खूप सकारात्मक आले आहेत. आता ती मानवांवर चाचण्यांसाठी तयार केली जात आहे. सर्व चाचण्या आणि मान्यता एकत्रित करण्यासाठी सुमारे 7 वर्षे लागू शकतात. ही लस भारतात बनवली जात आहे आणि मेक इन इंडियाचे एक उत्तम उदाहरण म्हणून तिचे वर्णन केले जात आहे. ती एकाच वेळी संसर्ग रोखणे आणि मलेरियाचा प्रसार थांबवण्यास मदत करणे अशा दोन पातळ्यांवर काम करते. ही सध्याच्या परदेशी लसींपेक्षा अधिक प्रभावी आणि स्वस्त असू शकते. ही लस जगातील सर्वात धोकादायक मलेरिया परजीवी, म्हणजेच प्लाज्मोडियम फाल्सीपेरमवर परिणामकारक आहे. दुहेरी सुरक्षा प्रदान करते. परंतु प्रत्यक्ष वापरासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews