सरेंडर शब्द राहुल गांधींच्या डीएनएत आणि काँग्रेसच्या डिक्शनरीत, भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डांचं जोरदार प्रत्युत्तर

Written by:Smita Gangurde
Published:
राहुल गांधी हे चीन आणि पाकिस्तानचे पेड एजंट आहेत अशी टीका ते करत असल्याचा आरोपही भाजपाकडून करण्यात येतोय.
सरेंडर शब्द राहुल गांधींच्या डीएनएत आणि काँग्रेसच्या डिक्शनरीत, भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डांचं जोरदार प्रत्युत्तर

नवी दिल्ली – ‘नरेंद्र सरेंडर’ ही राहुल गांधी यांची टीका देशद्रोहापेक्षा कमी नाही, असा जोरदार पटलवार भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलाय. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला नड्डा यांनी एक्स पोस्टवर जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

एक्स पोस्टमध्ये जे पी नड्डा यांनी लिहिलंय की, राहुल गांधी, सरेंडर तुम्ही करत असाल, कारण तुमचा इतिहास तसाच राहिलेला आहे. भारत कधी सरेंडर होत नाही. तुमच्या काँग्रेस पक्षाच्या डिक्शनरीत सरेंडर हा शब्द आहे. तुमच्या डीएनएतही हाच शब्द आहे.

पाकिस्तान रडतंय आणि राहुल काय म्हणतायेत- नड्डा

जे पी नड्डा यांनी राहुल गांधी यांच्यावर पलटवार करताना पुढं लिहिलंय की, पाकिस्तान एकीकडे रडत रडत सगळ्याजगाला सांगतंय की भारतीय सैन्यानं पाकमध्ये 18 ठिकाणी हल्ले केले. सगळं काही उद्ध्वस्त केलं. तर दुसरीकडे राहुल गांधी देश सरेंडर होत असल्याचं बोलतायेत. राहुल गांधी यांना हे माहीत असायला हवं की, ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वितेची जाहीर माहिती भारतीय सैन्यदलानं दिली होती.

राहुल गांधींचं वक्तव्य देशद्रोह

राहुल गांधी यांनी पंतप्रधानांबाबत केलेलं वक्तव्य हे देशद्रोहापेक्षा कमी नसल्याचा पलटवार जे पी नड्डा यांनी केलाय. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानात जो विनाश झाला, त्यानंतर पाकिस्तानी नागरिक, सैन्य आणि पाकिस्तानी पंतप्रधानही जे म्हणण्याची हिंमत करु शकत नाही, ते राहुल गांधी म्हणतायेत. असं नड्डा म्हणालेत

काय म्हणाले होते राहुल गांधी…

मंगळवारी भोपाळमध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले होते की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन आला आणि नरेंद्र लगेच सरेंडर झाले. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आपण चांगले ओळखतो. त्यांच्यावर थोडासा दबाव टाकला, थोडा धक्का मारला की ते घाबरुन पळून जातात.

काँग्रेसचे सरेंडर हिंदुस्तानच्या कॅलेंडरभर-भाजपा

नड्डा यांच्या टीकेपूर्वी भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी पक्षाच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेत राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली. विरोधी पक्षनेतेपद मिळाल्यानंतरही राहुल गांधी यांच्या परिपक्वता आणि गंभीरता आलेली नाही, अशी टीका त्यांनी केली. ऑपरेशन सिंदूरला सरेंडर म्हणणं हे त्यांची धोकादायक मानसिकता दाखवत असल्याचं त्रिवेदी म्हणालेत.

राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानं भारतीय सैन्याचा अपमान केल्याची टीका करण्यात येतेय. पाकिस्तानी सैन्यप्रमुख, दहसतवादी संघटनाही जे म्हणाल्या नाहीत, ते राहुल गांधी म्हणाले आहेत, अशी टीका त्रिवेदी यांनी केलीय.

1947 मध्ये मुस्लीम लीगच्या समोर काँग्रेसनं देश सरेंडर केला. 1948 मध्ये काश्मिराचा प्रदेश सरेंडर केला. 1960 मध्ये सिंधू नदीचं 80 टक्के पाणी सरेंडर केलं. 1965 मध्ये जिंकलेलं हाजी पीर सरेंडर केलं, असं सांगत हिंदुस्तानचं कॅलेंडर काँग्रेसच्या सरेंडरनं भरलेली असल्याची टीका भाजपानं केलीय.

 

Follow Us :GoogleNews