पाकिस्तानात लष्कराच्या बसवर मोठा हल्ला; 12 सैनिकांचा मृत्यू, 4 जण गंभीर जखमी

Written by:Rohit Shinde
Published:
पाकिस्तानच्या वजीरिस्तान भागात मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. या ठिकाणी पाकिस्तानी सैन्याच्या तुकडीवर हल्ला झाला यात 12 सैनिकांचा मृ्त्यू झाला तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत.
पाकिस्तानात लष्कराच्या बसवर मोठा हल्ला; 12 सैनिकांचा मृत्यू, 4 जण गंभीर जखमी

दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानलाच आता दहशतवादी हल्ल्यांचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात खरंतर एक मोठी बातमी समोर आली आहे. दक्षिण वजीरिस्तान भागात मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. या ठिकाणी पाकिस्तानी सैन्याच्या तुकडीवर हल्ला झाला यात 12 सैनिकांचा मृ्त्यू झाला तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत.

तेहरिक-ए-तालिबानचाच कारनामा

पाकिस्तानी सैन्याने या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. जखमी सैनिकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक सुरक्षा दलांच्या मते हा हल्ला अतिशय सुनियोजित पद्धतीने करण्यात आला. हल्ला इतका अनपेक्षित होता की सैन्याला कोणतीही प्रतिक्रिया देता आली नाही. तेहरिक-ए तालिबानने या संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. आमच्या लोकांनी सैनिकांकडून हत्यारे हिसकावून घेतली. यानंतर आता सुरक्षा यंत्रणा आणि स्थानिक प्रशासनाने शोधमोहिम सुरू केली आहे. नागरिकांनी सतर्क राहावे आणि संशयास्पद हालचालींची तत्काळ माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

सीमावर्ती भागात दहशतवादी कारवाया

खैबर पख्तूनख्वा प्रांतात अलीकडच्या काळात झालेल्या हल्ल्यातील हा एक मोठा हल्ला होता. या भागावर टीटीपीचे नियंत्रण होते. परंतु, 2014 मधील एका सैन्य मोहिमेनंतर त्यांना मागे हटावे लागले. 2021 मध्ये अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यापासून दोन्ही देशांच्या सीमावर्ती भागात दहशतवादी घटना वाढल्या आहेत. टीटीपी आणि अफगाण तालिबानचे संबंधही चांगले आहेत. अफगाणिस्तानातून पाकिस्तानात हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांना नियंत्रणात आणण्यात अफगाणिस्तान सरकार अपयशी ठरल्याचा दावा पाकिस्तान करत असतो. परंतु, अफगाणिस्तानकडून हा दावा फेटाळण्यात आला आहे.

1 जानेवारीपासून खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान प्रांतातील हल्ल्यांत आतापर्यंत 460 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सुरक्षा दलातील जवानांचा समावेश आहे. सेंटर फॉर रिसर्च अँड सिक्युरिटी स्टडीजच्या रिपोर्टनुसार मागील वर्षात पाकिस्तानने जवळपास दहा वर्षांतील सर्वाधिक कठीण काळाचा सामना केला आहे. या काळात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांत 1600 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे वाढता अंतर्गत आणि सीमावर्ती भागातील दहशतवाद हा आता पाकिस्तानसमोरील एक मोठा प्रश्न बनला आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews