Marathi News

सर्व टार्गेट अचूकपणे हिट करण्यात आले; व्योमिका, सोफिया आणि परराष्ट्र सचिवांनी सांगितली Operation Sindoor ची प्रत्येक घडामोड

Written by:Smita Gangurde
Published:
भारतातील ताकदवान महिला विंग कमांडर व्योमिका सिंह आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी ऑपरेशन सिंदूरच्या दोन दिवसात घडलेल्या घडामोडी सांगितल्या
सर्व टार्गेट अचूकपणे हिट करण्यात आले; व्योमिका, सोफिया आणि परराष्ट्र सचिवांनी सांगितली Operation Sindoor ची प्रत्येक घडामोड

पाकिस्तानातील दहशतवादा विरोधातील भारताचं ऑपरेशन सिंदूरचे दोन दिवस पूर्ण झाले आहेत. यावर परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली. यावेळी विंग कमांडर व्योमिका सिंह आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी ऑपरेशन सिंदूरच्या दोन दिवसात घडलेल्या घडामोडी सांगितल्या. ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानकडून भारतातील शहरांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र भारतीय सशस्त्र दलाने त्यांचा प्रयत्न हाणून पाडला.

कर्नल सोफिया कुरेशी काय म्हणाल्या…

पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या, ७ मे रोजीच सांगितलं गेलं होतं की, ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतातील कोणत्याही सैन्य ठिकाणांवर केलेल्या हल्ल्याचं प्रत्युत्तर दिलं जाईल. ७ आणि ८ मेच्या रात्री पाकिस्तानने उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक सैन्य ठिकाणी उदाहरणार्थ अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठानकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपुर, भठिंडा, चंडीगढ़, नाल फलौदी, उत्तरलाई आणि भुज येथे ड्रोन आणि मिसाइलने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्याला इंडिग्रेडेट काऊंटर ग्रीड आणि वायु रक्षा प्रणालीने हाणून पाडण्यात आलं. याचे अवशेष अनेक ठिकाणी सापडले आहेत, जे पाकिस्तानी हल्ल्याचे पुरावे आहेत.

त्या पुढे म्हणाल्या, आज सकाळी भारताच्या सशस्त्र दलांनी पाकिस्तानच्या वायुरक्षा रडार आणि प्रणालींवर निशाणा साधला. लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टिमदेखील उद्ध्वस्त करण्यात आली. कर्नल सोफियांनी सांगितलं की, पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर गोळीबाराचं प्रमाण वाढवलं आहे. कुपवाडा, मेंढर, बारामुल्ला, उरी, पुंछ आणि राजोरीमध्ये मोर्टार आणि मोठ्या तोफखान्याचा वापर केला जात आहे.

विक्रम मिसरी काय म्हणाले…

 

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिसरी ऑपरेशन सिंदूरबाबत म्हणाले, हे प्रकरण २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यापासून सुरू झालं आहे. भारताने केवळ प्रत्युत्तर दिलं आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीत जेव्हा पहलगाम हल्ल्याबाबत एक प्रेस वक्तव्य जारी करण्याबाबत चर्चा होत होती, तेव्हा विचार करा की कोणत्या देशाने टीआरएफच्या उल्लेख करण्याला विरोध केला होता. टीआरएफ या संघटनेनेच पहलगाम हल्ल्याची एकदा नाही दोन वेळा जबाबदारी घेतली होती. जेव्हा त्यांच्या आकांना वाटलं की परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते त्यांनी आपलं नाव मागे घेतलं.

ते पुढे म्हणाले, भारताचा प्रतिसाद अत्यंत संयमी होता. आम्हाला हे प्रकरण वाढवायचं नाही. सर्व टार्गेग अत्यंत अचूकपणे हिट करण्यात आले आहेत.

पाकिस्तानच्या पापांची मोजणी…

विक्रम मिसरी म्हणाले, पाकिस्तानकडून पहलगामवर तपास समिती स्थापन करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र त्यांचा मागील इतिहास त्यांचे हेतू स्पष्ट करतो. मुंबई आणि पठाणकोट हल्ल्यांसह अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये भारताने पाकिस्तानला अनेक पुरावे दिले आहेत. त्यांच्या मास्टरमाइंडला कायद्याच्या कचाट्यात आणण्याबद्दल सांगण्यात आलं, परंतू पाकिस्तानने कधीही कोणतीही कारवाई केली नाही.

केवळ दहशतवादी ठिकाणांवर निशाणा

परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं की, भारताने पाकिस्तानातील कोणत्याही शहरी भागाला टार्गेट केलं नाही. ऑपरेशन सिंदूरअंतर्गत केवळ दहशतवादी ठिकाणं निशाण्यावर ठेवण्यात आली आणि ती उद्ध्वस्त करण्यात आली. दुसरीकडे पाकिस्तानने दुसऱ्याच दिवशी रात्रीच्या वेळी भारताच्या अनेक शहरी भागांवर हल्ला केला.

Follow Us :GoogleNews