कोलंबियात राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या डोक्यात घातली अल्पवयीन मुलानं गोळी, प्रचारसभेत गोळीबार

Written by:Smita Gangurde
Published:
पहिल्या पातळीवरील शस्त्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती मिळाली असून पुढील काही तास हे त्यांच्या जीवन-मरणाच्या संघर्षासाठी महत्त्वाचे असल्याचं सांगण्यात येतंय.
कोलंबियात राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या डोक्यात घातली अल्पवयीन मुलानं गोळी, प्रचारसभेत गोळीबार

बोगोटा- दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या प्रचारसभेत गोळीबार झाला. उमेदवार मिगुएल उरीबे हे प्रचारसभेत भाषण करत असताना त्यांच्या डोक्यात गोळी मारण्यात आलीय. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पहिल्या पातळीवरील शस्त्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती मिळाली असून पुढील काही तास हे त्यांच्या जीवन-मरणाच्या संघर्षासाठी महत्त्वाचे असल्याचं सांगण्यात येतंय. उरीबे यांच्यावर गोळीबार करणाऱ्या 15 वर्ष वयाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलंय?

राजधानी बोगोटामध्ये एका प्रचारसभेत शनिवारी हा गोळीबार झाल्याची माहिती आहे. उमेदवार उरीबे यांना तीन गोळ्या लागल्या आहेत. यातली एक गोळी त्यांच्या डोक्यात मारण्यात आलीय. कोलंबियात 2026 साली राष्ट्रपतींची निवडणूक होणार आहे. मिगुएल उरीबे हे राष्ट्रपतीपदाचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. विरोधी पक्ष असलेल्या सेंट्रो डेमोक्रेटिक कन्झरव्हेटिव्ह पार्टीचे उरीबे हे सदस्य आहेत.

हल्लेखोरानं पाठीवर गोळीबार केल्याची माहिती त्यांच्या पक्षाकडून देण्यात आलीय. बोगोटा शहरात फोंतिबोनो भागात हा हल्ला झाला. उरीबे यांची परिस्थिती लक्षात घेता शहरातील सर्व रुग्णालयांना हाय अलर्टवर ठेवण्यात आलंय.

34 वर्षांपूर्वी उरीबे यांची आईही मारली गेली

कोलंबियातील प्रसिद्ध पत्रकार डायना टर्बे यांचे पुत्र अशी उरीबे यांची ओळख आहे. ड्रग्ज माफिया पाब्लो एस्कोबारच्या मेडेलिन कार्टेलनं 1991 साली डायना यांचं अपहरण केलं होतं. डायना या त्या काळात ड्रग्ज तस्करी, संघटित गुन्हेगारीविरोधात आवाज उठवणाऱ्या मोठ्या पत्रकारांपैकी एक होत्या. बचाव मोहिमेत डायना यांचा मृत्यू झाला होता.

माजी राष्ट्रपती ज्युलियो सीझर यांचे नातू मिगुएल

गोळीबार झालेल्या उरीबे यांचं लहानपणापासून राजकारणाशी नातं आहे. माजी राष्ट्रपती जुलियो सीझर टर्बे यांचे ते नातू आहेत. 1978 ते 1982 या कालावधीत ज्युलियो हे कोलंबियाचे 25वे राष्ट्रपती होते.

Follow Us :GoogleNews